

विटा : बनावट चलन तयार करण्यासाठी बोगस साहित्य विकून फसवणूक करणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला शुक्रवारी विटा न्यायालयाने दोषी ठरवून आठ वर्षांची शिक्षा सुनावली. मार्क विल्यम ऊर्फ इसाई किपंनगेती ज मुथाय ऊर्फ अँथोनी ओयेमिना असे त्याचे नाव असून तो मूळ नामिबिया देशाचा रहिवासी आहे. त्याच्यावर तब्बल 84 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होता. तो न्यायालयात सिद्ध झाला.
आठ वर्षांपूर्वी विट्यातील जय भवानी कन्स्ट्रक्शनमध्ये एकेदिवशी भर दुपारी तिघे आले. यापैकी एका नायजेरियन व्यक्तीने आपले नाव मार्क विल्यम असून आम्हाला तुमच्या कन्स्ट्रक्शनमध्ये गुंतवणूक करायची आहे, असे या कंपनीतील सचिन बाळकृष्ण लोटके यांना सांगितले. गुंतवणूक करण्यासाठी त्यांच्याकडे असलेली 27 कोटीची ॲन्टी ब्रीज मनी म्हणजे ब्लॅक करन्सी ‘युरो’ या विदेशी चलनात रूपांतरीत करायची आहे आणि त्यानंतर भारतीय रुपयामध्ये बदलून तो पैसा गुंतवणूक करणार आहे, असेही सांगितले. ‘या सर्व प्रक्रियेसाठी 27 कोटीची ब्लॅक करन्सी अर्थात काळा पैसा वर द्यावा लागेल. त्यासाठी लिक्वीड ओरिजनल 500 युरो चलनाच्या (तत्काळ रोकड) 120 नोटा आणि त्यासाठी आवश्यक असलेली ब्लॅक करन्सी (काळा पैसा) हा आम्हाला बंगळुरू येथील ग्लोबल सिक्युरिटी ऑफिस येथून सोडवायचा आहे. ते करण्यासाठी आणि सर्व प्रक्रिया करण्यासाठी कागदाचे बंडल ठेवण्याकरिता जे लॉकर्स लागतात, त्यासाठी तुम्ही आम्हाला काही रक्कम द्या’, असे सांगून जय भवानी कन्स्ट्रक्शनचे सचिन लोटके आणि त्यांच्या मित्रांकडून डिसेंबर 2017 ते 5 मे 2018 या कालावधीत वेळोवेळी एकूण 84 लाख 80 हजार रुपये रक्कम रोख स्वरूपात घेतली.
त्यानंतर ही ब्लॅक करन्सी (काळा पैसा) विदेशी युरोमध्ये रूपांतरीत करण्याची प्रक्रिया करीत असताना विल्यम आणि त्याच्या साथीदारांनी दिलेले काळे कागद, लिक्वीड, 500 युरो चलनाच्या 120 नोटा व इतर साहित्य, अशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया केली. मात्र या भानगडीत बोगस चलन तयार करण्यासाठी दिलेले साहित्यच बनावट असल्याचे सचिन लोटके आणि त्यांच्या मित्रांना समजून आले. 15 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांनी विटा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली.