

तासगाव : निमणी (ता. तासगाव) येथे झालेल्या चेतन ऊर्फ बुलट्या दर्ग्या पवार याचा खून हा खुनाच्या भीतीपोटी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. याप्रकरणी अटक केलेल्या दोघा संशयितांना 22 ऑक्टोबरअखेर पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक बिरदेव काबुगडे यांनी दिली.
बुलट्या ऊर्फ चेतन पवार हा एका खून प्रकरणातील आरोपी आहे. तो काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला आहे. संशयित दोघे व बुलट्या हे मित्र होते. त्यांच्यात नेहमी उठ-बस असायची. दारूसाठी ते एकमेकांशी वाद घालायचे. यादरम्यान बुलट्या याने संशयित रोहित ऊर्फ बाळ्या याला मारून टाकण्याची धमकी काही दिवसांपूर्वी दिली होती. यामुळे तो घाबरून होता. शुक्रवारी रोहित व बुलट्या यांच्यात पाचवा मैल येथे जोरदार वाद होऊन भांडण झाले. यावेळी बुलट्या याने रोहित याच्या खिशातील तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. रोहित हा मजुरी करून कुटुंब चालवतो. त्यातच बुलट्याने जबरदस्तीने तीन हजार रुपये काढून घेतल्याने रोहित संतापला होता. शिवाय बुलट्याने धमकी दिल्याने, तो कधीही आपला खून करेल, अशी भीती रोहितला होती या भीतीपोटी संशयितांनी बुलट्याचाच खून केल्याचे तपासात समोर आल्याचे काबुगडे यांनी सांगितले.