विद्यार्थिनींचा विनयभंग : देशिंग व पंचक्रोशीत कडकडीत बंद, निषेध मोर्चा
कवठेमहांकाळ : पुढारी वृत्तसेवा
शिक्षकानेच विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कवठेमहांकाळ तालुक्यातील एका शाळेत काल (सोमवार) दुपारी घडली. यानंतर पालकांनी सदर शिक्षकांविरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद केली होती. या फिर्यादीनुसार शिक्षकावर विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला होता.
या घटनेचे पडसाद पंचक्रोशीत उमटले असून, भरत कांबळे या नराधम शिक्षकाच्या विरोधात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे कृत्य या शिक्षकाने विद्यार्थिनीशी केले होते. तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्या प्रकरणाच्या निषेधार्थ देशिंग, हरोली, खरशिंग, बनेवाडी गावे बंद पाळून झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
नराधम शिक्षक भरत कांबळेला नोकरीवरून कायमस्वरूपी बडतर्फ करा अशी मागणी समस्त ग्रामस्थनी केली. असे कृत्य करणाऱ्या शिक्षकाला जास्तीत-जास्त शिक्षा व्हावी व शिक्षणमंत्री यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर त्या शिक्षकावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ व पालकांनी केली.
निषेध मोर्च्याला महिला, पालक, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती
शिक्षकाच्या या कृत्याच्या निषधार्थ ग्रामस्थांनी आज (मंगळवार) निषेध मोर्चा काढला. या मोर्चाला महिला, पालक, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी देशिंग गावचे सरपंच प्रवीण पवार, उपसरपंच राजू पाटील, सदस्य, मा.सभापती भारत डुबुले,पोपटराव जगताप, आण्णा भाऊ कोळेकर, हरोलीचे पोपट पाटील,भीमराव कागवाडे, चंदनशिवे, रुपेश सुर्वे व पालकांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर पोलीस पाटील, तलाठी, पोलीस प्रशासन, गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी घटनास्थळी उपअधीक्षक सुनील साळुंखे उपनिरीक्षक ज्योतीराम पाटील यांनी भेट दिली. देशिंग ता. कवठेमहांकाळ येथे नराधम शिक्षकावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला.