

मिरज : मिरज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस पळवून नेणार्या तरुणाने मिरजेत पोलिसांच्या डोळ्यांत धूळफेक करत ग्रामीण पोलिस ठाण्याच्या आवारातून पलायन केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली.
दोन आठवड्यांपूर्वी एका 16 वर्षीय मुलीस निहाल शकील हवालदार या तरुणाने फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिस तपासात निहाल व अल्पवयीन मुलगी कर्नाटकात असल्याचे समोर आले. त्यानंतर मिरज ग्रामीण पोलिसांच्या पथकाने येथे जाऊन दोघांना ताब्यात घेऊन बुधवारी सायंकाळी मिरजेत आणले. मात्र, ग्रामीण पोलिस ठाण्याच्या आवारात गाडीतून उतरवल्यानंतर निहाल हा अचानक पोलिसांना गुंगारा देत पळून गेला. पोलिसांनी परिसरात शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. निहाल याच्या शोधसाठी पोलिसांचे पथक विविध ठिकाणी पाठवण्यात आले आहे.