

देवराष्ट्रे ः देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे किरकोळ वादातून महादेव नारायण म्हस्के (वय 55) यांचा लाकडी दांडक्याने मारहाण करून निर्घृण खून करण्यात आला. डोक्यात, छातीवर आणि शरीराच्या नाजूक भागांवर वर्मी घाव घालून हा खून करण्यात आला. याप्रकरणी विकास उर्फ बाळू उत्तम माने (वय 26, रा. आंधळी, ता. पलूस) या संशयितास पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात अटक केली. मंगळवार, दि. 1 जुलैरोजी रात्री उशिरा देवराष्ट्रे-कुंभारगाव रस्त्यालगत असलेल्या वस्तीवर ही धक्कादायक घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, महादेव म्हस्के आणि संशयित विकास माने हे दोघेही देवराष्ट्रे येथील तानाजी मोहिते यांच्याकडे बांधकाम कामगार म्हणून काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून हे दोघे देवराष्ट्रे-कुंभारगाव रस्त्यालगतच्या वस्तीवर रात्री झोपण्यासाठी जात होते. पंधरा दिवसांपूर्वी झोपेत असताना पाय लागल्याने दोघांची बाचाबाची झाली होती. या घटनेचा राग विकास माने याच्या मनात होता. मंगळवारी सायंकाळी जेवण झाल्यानंतर दोघेही पुन्हा वस्तीवर झोपायला गेले. यावेळी पूर्वी झालेल्या बाचाबाचीवरून त्यांच्यात पुन्हा भांडण सुरू झाले. या भांडणातून संशयित विकास माने याने लाकडी दांडक्याने म्हस्के यांच्या डोक्यात, छातीवर, पायांवर तसेच शरीराच्या नाजूक जागांवर जोरदार प्रहार केले. या मारहाणीत म्हस्के यांना गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी वस्तीवरील एका व्यक्तीने गावात राहणार्या म्हस्के यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ चिंचणी-वांगी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
चिंचणी-वांगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल घुगे आणि उपनिरीक्षक शेलार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत स्थानिक नागरिकांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत अवघ्या अर्ध्या तासातच खुनाचा उलगडा केला आणि आंधळी येथून संशयित विकास माने याला अटक केली. बुधवारी सायंकाळी उशिरा मृत महादेव म्हस्के यांचे पुतणे धनंजय म्हस्के यांनी चिंचणी पोलिसांत फिर्याद दिली असून, सहाय्यक निरीक्षक राहुल घुले अधिक तपास करत आहेत.