Leopard Attack: चार वर्षांच्या बालकावर बिबट्याचा हल्ला

शिराळा तालुक्यातील गिरजवडेपैकी मुळीकवाडी येथील घटना
Leopard Attack |
Leopard Attack: चार वर्षांच्या बालकावर बिबट्याचा हल्लाPudhari file photo
Published on
Updated on

शिराळा शहर : गिरजवडेपैकी मुळीकवाडी (ता. शिराळा) येथे आजोबांसोबत शेतात गेलेल्या आरव अमोल मुळीक या चार वर्षांच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला. हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाले आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बजरंग मुळीक हे आपला नातू आरव याला घेऊन गाडेमळ्याशेजारी पाचिरो पाडा येथे जनावरांसाठी गवत आणण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत काशीनाथ मुळीक, शोभा मुळीक, राजेश्री मुळीक होते. त्यावेळी अचानक झाडाच्या आड लपलेल्या बिबट्याने आरववर झडप घालून त्यास उसाच्या शेतात फरफटत नेले. आरवची आरडाओरड ऐकून काशीनाथ मुळीक बिबट्याच्या दिशेने धावले. त्यांनी धाडसाने बिबट्याला हुसकावत आरवची सुटका केली. बिबट्याच्या झडपेत आरव गंभीर जखमी झाला. बजरंग मुळीक आणि मोहन मुळीक यांनी त्यास तत्काळ दुचाकीवरून शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती सरपंच सचिन देसाई यांनी वन विभागाला दिली. डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ. मनोज महिंद यांनी प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी कराड येथे दाखल केले. वन विभागाचे एकनाथ पारधी, अनिल वाजे, स्वाती कोकरे, प्राणीमित्र प्रा. सुशीलकुमार गायकवाड, बंटी नांगरे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी सरपंच सचिन देसाई, आनंदा मोंडे, सुखदेव मुळीक, महेश मुळीक, प्रशांत पाटील उपस्थित होते. 20 सप्टेंबरला कणदूर (ता. शिराळा) येथील विष्णू दादू पाटील, त्यांच्या पत्नी वनिता आणि मुलगी आयेशा यांच्या दुचाकीवर रेठरेधरणजवळ बिबट्याने झडप टाकल्याने ते जखमी झाले होते. 25 सप्टेंबर रोजी बिऊर येथे मांजराचा पाठलाग करत बिबट्या सखाराम पाटील यांच्या घरात शिरला होता. त्यावेळी कुत्र्याला त्याने लक्ष्य केले.

घागरेवाडीत दुचाकीवर झेप

या घटनेनंतर काही वेळातच बिबट्याने शेजारील घागरेवाडी येथील विक्रम खोचरे यांच्या घराच्या बांधकामावर असणार्‍या योगेश कुरणे, भरत नायकल, सुजित शिरतोडे (सर्व रा. पेठ) या कामगारांच्या दुचाकीवर झडप घातली. मात्र ते या हल्ल्यातून बचावले.

डोळे पाणावले

कोवळ्या आरवच्या गळ्यावर, छातीवर बिबट्याने 17 ठिकाणी ओरबाडले आहे. त्याच्या रडण्याने त्याचे वडील, आजोबा यांना रडू कोसळले. उपस्थित नातेवाईकही गहिवरले होते. दिवसभर रानात हसतखेळत सोबत फिरणारा नातू बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने बजरंग मुळीक यांचे डोळे पाणावले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news