

सांगली : येथील कोल्हापूर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महानगरपालिकेने शुक्रवारी अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. सायंकाळी भारतभीम जोतिरामदादा सावर्डेकर कुस्ती आखाड्यासमोरील अतिक्रमणांवर जेबीसी चालवला. यादरम्यान वादावादीचा प्रकार घडला. खोकीधारकांचा विरोध मोडून काढत महापालिकेच्या पथकाने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. दहा अतिक्रमणे जमीनदोस्त केली. यामध्ये आठ खोक्यांचा समावेश आहे. शनिवारी कोल्हापूर रस्त्याच्या पूर्व बाजूकडील खोक्यांची अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत.
कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राजवळ बसच्या धडकेत एका महिलेचा बळी गेल्यानंतर या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला. नागरिक जागृती मंच, सर्वपक्षीय कृती समितीसह विविध संघटनांनी आवाज उठवला. अतिक्रमणे काढून रस्ता रुंदीकरणाचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी केली. दरम्यान, आयुक्त सत्यम गांधी यांनीही दोनवेळा या रस्त्याची पाहणी केली. भूमापन विभागाने 35 मीटर रुंदीने रस्त्याची हद्द निश्चित केली. तत्पूर्वी अतिक्रमित जागेतील खोकी काढून घेण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने संबंधित खोकीधारकांना दिल्या होत्या. तरिही अतिक्रमण काढून न घेतल्याने आयुक्त गांधी यांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.
उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख तथा सहायक आयुक्त नागार्जुन मद्रासी, सहायक आयुक्त सचिन सागावकर, मिरज विभागाकडील सहायक आयुक्तअनिस मुल्ला तसेच महापालिकेचे सर्व स्वच्छता निरीक्षक आणि अतिक्रमणविरोधी विभागाचे कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.