सांगली : कोल्हापूर येथे शासकीय नोकरीत असणार्या परिचारिकेवर लग्नाचे आमिष दाखवून सांगलीतील एका फ्लॅटमध्ये बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अत्याचार करणार्यासह त्याच्या साथीदारावर बलात्कार व अॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. सचिन संभाजी गायकवाड (वय 25, रा. घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) आणि अमोल कुरणे ( रा. कुंडलवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, पीडिता कोल्हापूर जिल्ह्यातील असून, ती परिचारिका आहे. संशयित सचिनने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी ओळख वाढविली. विश्वास संपादन केल्यावर सचिनने तिच्याशी सांगलीतील शंभरफुटी रस्त्यावरील एका फ्लॅटमध्ये वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिने लग्नाबाबत विचारणा करताच त्याने नकार देत जातिवाचक टिपणी केली. यानंतर तिने सचिनच्या नातेवाईकांशी संपर्क केला. तेव्हा त्याचा साथीदार अमोलने, तुझ्यासोबत सचिनचे लग्न होणार नाही, असे सांगत एक लाख रुपये देण्याची तयारी दाखविली.
या प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने पेठवडगाव (जि. कोल्हापूर) पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सहायक निरीक्षक अनिता पवार यांनी जबाब नोंदवून गुन्हा सांगलीत घडल्याने तपासासाठी विश्रामबाग पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. तपास उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव करीत आहेत.