

सांगली : पुणे-मुंबईतून सांगलीला येणारा माणूस जेव्हा शिवशंभो चौकातून कर्नाळ रस्त्यावरून सांगलीत घुसतो तेव्हा सांगलीच काडीचाही बदल झाला नसल्याची खात्री त्याला मिळते. कारण वर्षानुवर्षं चिखल, दलदल, गर्दीत अडकलेला हा रस्ता आहे तसाच खितपत पडला आहे. हा रस्ताच नाही तर रस्त्याभोवतीची नागरी वस्तीही अशीच समस्यात अडकून पडली आहे.
महापूर आला की सगळ्यात पहिल्यांचा पाण्याखाली जातो तो कर्नाळ रस्ता. कर्नाळ पूल. कर्नाळ रस्त्यावर पुराचे पाणी आले की नदीकाठच्या उपनगरात राहणारे नागरिक घर आवरायला घेतात. इतकी या रस्ता आणि पुलाची ख्याती आहे. इतकी वर्षं झाली, पूर आले आणि गेले पण या रस्त्याची अवस्था मात्र सुधारली नाही. पाच मिनिटे पाऊस झाला तरी या रस्त्यावर पाण्याची घाण, डबकी साठतात आणि या डबक्यातून मणके ढिले झालेले पुण्या मुंबईहून सांगलीला येणारे हजारो पाहुणे सांगली चांगली कशी, असा सवाल करतात. पण बांधकाम विभागाला याची कसलीही खंत ना खेद. याच रस्त्यावर सांगली आणि पुण्या मुंबईला जोडणारा जुना पूल आहे. रोज शेकडो वाहनांची ये-जा असलेल्या या पुलाची पावसाळ्यापूर्वी तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. बारोमास शेरीनाला आणि पावसाळ्यात पुराखाली असलेल्या या पुलाचा भक्कमपणा राहिला आहे का, ते तपासण्याची आवश्यकता आहे.