

इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथील इटकरे फाट्यानजीक खासगी बसमधून प्रवासी महिलेचे 8 तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. हा प्रकार रविवारी रात्री घडला. याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिलेचे पती रवींद्र ज्ञानदेव पाटील (वय 63, रा. नेरुळ नवी मुंबई ) यांनी फिर्याद दिली आहे.
रवींद्र, त्यांच्या पत्नी संजिवनी, सून कोमल, नात हे शुक्रवारी त्यांच्या मूळ गावी अकनूर (जि. कोल्हापूर) येथे आले होते. रविवारी रात्री रवींद्र हे कुटुंबासह खासगी बस (एमएच 04 एलक्यू 7435) ने कोल्हापूरकडून मुंबईला निघाले होते. चालकाने रात्री कामेरी हद्दीत महामार्गानजिक एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी बस थांबवली होती. रवींद्र व त्यांच्या कुटुंबातील जेवण करण्यासाठी उतरले होते. तेथे बस 45 मिनिटे होती.
त्यानंतर सकाळी रवींद्र व त्यांच्या घरचे मुंबई येथे बसमधून उतरले. घरात गेल्यानंतर त्यांनी बॅगची तपासणी केली. त्यावेळी बॅगमध्ये लॅपटॉप होता. परंतु बॅगेत ठेवलेले सोन्याचे 4 तोळ्यांचे मंगळसूत्र, 4 तोळ्यांच्या बांगड्या असा सुमारे 8 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यानी लांबवला होता. मंगळवारी तो गुन्हा इस्लामपूर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.