

ऐतवडे बुद्रुक : कष्टकरी, गोरगरीब आणि शेतकरी दिवाळीत राज्य सरकारचा ‘आनंदाचा शिधा’ मिळेल, या आशेवर होते. मात्र, यावेळी हा बहुप्रतीक्षित शिधा तर मिळालाच नाही, उलट शेतकर्यांना हायब्रीड ज्वारी देऊन सरकारने क्रूर थट्टा केली आहे. यामुळे भागातील लाभार्थ्यांमधून संतप्त लाट उसळली आहे. हायब्रीड ज्वारीचे वाळवा पुरवठा विभागाकडून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात वितरण करण्यात आले आहे.
गरजूंना सणासुदीच्या काळात थोडासा दिलासा मिळावा, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘आनंदाचा शिधा’ ही योजना अमलात आणली होती. या योजनेचे सामान्यांतून स्वागतही करण्यात आले आहे. मात्र, सरकार बदलल्यानंतर हे शिधावाटपही थांबले. मात्र, अतिवृष्टीने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. तीच अवस्था मजुरांचीही आहे. असे असताना या दिवाळीत स्वस्त धान्य दुकानांमधून सरकारकडून गहू, तांदूळ यांच्यासोबत, तेल, डाळ, साखरही मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात मिळालेले धान्य पाहून लोकांतून संताप व्यक्त होत आहे. शासन लोकांची थट्टा करीत असल्याचा आरोप होत आहे. तसेच याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी आवाज उठवण्याची मागणी लोकांतून होत आहे.