

सांगली : सांगलीतील सराफाला 23 लाख 56 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सराफ व्यावसायिक अमन शहाबुद्दीन पखाली यांनी सहाजणांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये वसीम सलीम शेख (रा. 50 फुटी, सांगली), त्याचा भाऊ मोसीन शेख, पत्नी सुमय्या वसीम शेख, त्याचा मित्र तेजस माने, राज सोनावले आणि सराफ व्यावसायिक धनाजी पोपट कदम (सर्व रा. सांगली) यांचा समावेश आहे.
फिर्यादी अमन पखाली यांचे 50 फुटी रस्त्यावर एस.पी.ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानामध्ये वसीम शेख हा वारंवार सोने खरेदीसाठी येत होता. त्यामुळे त्यांची ओळख झाली होती. दि. 15 एप्रिल 2025 रोजी वसीम हा पत्नी सुमय्या यांच्यासोबत सोने खरेदीसाठी दुकानात आला. त्याने 11 लाख 80 हजारी रुपयांचे 119.860 ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी केले, तर भाऊ मोसीन शेख याच्यासाठी 5 लाख 70 हजार रुपये किमतीचे 61.360 ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी केले. परंतु त्यावेळी त्यांनी पैसे दिले नाहीत, ‘पैसे उद्या आणून देतो’ असे सांगितले.
त्यावर अमन यांचा विश्वास बसला. त्यांनी केलेल्या पावतीवर फक्त वसीम यांनी खरेदी केलेल्या पावतीवर सही केली. भाऊ मोसीन याने खरेदी केलेल्या सोन्याच्या पावतीवर मात्र सही केली नाही. ‘विश्वास नाही का? ओळखत नाही का?’ असे म्हणून दुसऱ्या दिवशी पैसे आणून देण्याचा विश्वास देऊन ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी दि. 16 एप्रिल रोजी वसीम हा त्याचे मित्र तेजस माने आणि राज सोनावले या दोघांना घेऊन पुन्हा सराफ दुकानात आला. तेजस याच्या नावे 2 लाख एक हजाराचे, तर राज याच्या नावे 4 लाख 5 हजाराचे दागिने खरेदी केले. पैसे आणून देण्याचा विश्वास दाखवून निघून गेले.
अमन यांनी संशयितांना वारंवार फोन करून खरेदी केलेल्या दागिन्यांचे पैसे देण्याची मागणी केली. परंतु वारंवार मागणी करूनही पैसे न देता उधारीवर सोने नेऊन 23 लाख 56 हजार रुपयांचा गंडा त्यांनी घातला. त्यानंतर सांगलीतून संशयितांनी पलायन केले असल्याचे अमन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत त्यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस याचा तपास करीत आहेत.