

वैभव केंगार
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायतीत तीन वर्षांत तब्बल चौथ्यांदा नगराध्यक्ष पदात बदल झाला आहे, तर सत्तेतील अस्थिरतेचा झटका थेट प्रशासनाच्या कामकाजावर बसला आहे. नगराध्यक्ष रणजित घाडगे यांनी नुकताच राजीनामा दिल्याने पुन्हा एकदा नगराध्यक्ष पद रिक्त झाले आहे. या सततच्या सत्तांतराच्या खेळामुळे शहरातील नागरी विकास पूर्णपणे बाजूला पडला आहे. सत्ताधार्यांतील अंतर्गत संघर्ष, गटबाजी व डावपेच यामुळे शहरातील विकास कामांचा गाडा मात्र अंधारातच भरकटला आहे. सत्ता संगीत खुर्चीसारखी, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
सन 2021 च्या निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्याविरोधात पॅनल तयार करून आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाने सत्ता मिळवली होती. नगराध्यक्षपदी अश्विनी महेश पाटील यांची नियुक्ती झाली. मात्र काही महिन्यांतच राजीनामा देण्यात आला आणि सत्तेची वाटणी सुरू झाली. माजी खासदार संजय पाटील यांच्या गटाने राजकीय डावपेच खेळत सत्ता आपल्या बाजूला वळवली. त्यांच्या पाठबळावर सिंधू गावडे, अजित माने आणि शेवटी रणजित घाडगे नगराध्यक्ष झाले. पण ही माळ इथेही तुटली आणि घाडगे यांनीही पदाचा राजीनामा दिला. अशा सलगच्या बदलांमुळे नगराध्यक्षपद म्हणजे ‘संगीत खुर्ची’सारखा खेळ ठरला आहे. यामागे सत्ताधार्यांतील अंतर्गत मतभेद, गटबाजी आणि वैयक्तिक राजकीय आकांक्षा कारणीभूत असल्याचे चित्र आहे. प्रत्येक बदलात कोणता ना कोणता गट वरचढ ठरण्याचा प्रयत्न करत असल्याने नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा मात्र फोल ठरत आहेत. मात्र नगरपंचायतीची निवडणूक वर्षभराने होईल. नगराध्यक्ष पदाचा राजीनामा प्रकरणामुळे इच्छुक नगरसेवकांपैकी आताच एकाला नगराध्यक्ष पदाची लॉटरी लागली आहे. सुरुवातीपासून आजअखेर नगराध्यक्ष पद भूषवलेल्यांमध्ये साधना कांबळे, सविता माने, पंडित दळवी, अश्विनी पाटील, सिंधू गावडे, अजित माने आणि रणजित घाडगे यांचा समावेश आहे.
दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणानुसार, आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्षपद पुन्हा एकदा सर्वसाधारण (खुल्या) प्रवर्गासाठी खुले राहिले आहे. यामुळे इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली असून, अनेकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.