गोटखिंडी : पुढारी वृत्तसेवा
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या गोटखिंडी (ता. वाळवा) येथील झुंजार चौकातील मशिदीत शनिवारी आष्टा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्याहस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गोटखिंडी येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लालासाहेब थोरात यांनी सांगितले की, 1980 पासून गेली 44 वर्षे येथील हिंदू-मुस्लिम ग्रामस्थांनी व न्यू गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही परंपरा अखंड जपली आहे. हिंदू-मुस्लिम बांधव दररोज एकत्र येऊन गणपतीची आरती करतात, तर हिंदू बांधव मुस्लिमांचा रोजा करीत असतात. गणेशोत्सव काळात मुस्लिम बांधव मांसाहार करीत नाहीत. 1982 मध्ये मोहरम व गणेशोत्सव एकाच वेळी आले होते, त्यावेळी या मशिदीमध्ये एकाच ठिकाणी गणेश मूर्ती व पंजाची स्थापना करण्यात आली होती.
यावर्षी न्यू गणेश तरुण मंडळाने झुंजार चौक ते अमृतेश्वर देवालयापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. गणेशोत्सव काळात दररोज सामाजिक व पौराणिक नाटिका सादर केल्या जाणार आहेत. मंडळाचे अध्यक्ष गणेश फाळके यांनी सांगितले की, मंडळाने यापूर्वी रक्तदान, वृक्षारोपण, अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. या पुढील काळातील ही परंपरा अशी चालू ठेवण्यात येणार आहे. यावेळी आष्टा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजित आवटे, राहुल कोकाटे, सचिन शेजावळे, रियाज मुलाणी, विनायक पाटील, अर्जुन कोकाटे, अशोक पाटील, मोहसीन पठाण, ईलाई पठाण, प्रशांत थोरात, रोहन थोरात, सनी थोरात यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी हिंदू - मुस्लिम कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.