

तासगाव : तालुक्यातील एका गावातील प्रेमिकांनी चार दिवसांपूर्वीच विवाह केला असताना, वधूकडील काहींनी येथील न्यायालयाच्या आवारातच वधूला नेण्याच्या कारणावरून जोरदार बाचाबाची केली. वेळेत पोलिसांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र न्यायालय व पोलिस ठाण्याच्या आवारात हा गोंधळ सुमारे पंधरा मिनिटे सुरू होता.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी : तालुक्यातील एका गावातील प्रेमिकांनी चार दिवसांपूर्वी कोणाला कल्पना न देता विवाह केला होता. या घटनेने मुलीकडचे चांगलेच संतापले होते. वधू व वर दोघेही सज्ञान असल्याने किंबहुना सज्ञान झाल्यानंतर विवाह केला होता. याची माहिती मिळताच वराकडील मंडळींनी या विवाहाला संमती दिली, मात्र वधूकडील मंडळी संतापल्याने ही विवाहाची वरात दोन दिवसांपूर्वी पोलिसात आली होती. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना समजावून सांगितले होते. मात्र मुलीकडच्यांनी आई, वडिलांच्या मिळकतीवर हक्क सांगू नये, तिने हक्कसोडपत्र लिहून द्यावे, अशी मागणी मुलाकडच्या मंडळींना केली. मुलांकडील मंडळींनी ही मागणी मान्य करून ते नववधूला मोटारीतून घेऊन मंगळवारी दुपारी न्यायालयाच्या आवारात आले होते. यावेळी नववधू व वराकडील जमलेल्या समर्थकांत वाद रंगला. त्यातून खेचाखेची सुरू झाली. जोरदार आरडाओरड सुरू होताच बघ्यांची चांगलीच गर्दी झाली. एवढ्यात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी संबंधितांना त्या ठिकाणाहून दूर केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र या घटनेची न्यायालय आणि पोलिस ठाण्याच्या आवारात जोरदार चर्चा सुरू होती.