

संदीप माने
इस्लामपूर : वडील अल्पभूधारक शेतकरी. आर्थिक चणचण. कुटुंब चालवण्यासाठी ते एमआयडीसीत कामाला. मुलीच्या शिक्षणासाठी आईने सोने मोडले. समाजातील काहींनी मुलीच्या शिक्षणावरून टोमणे दिले. मात्र, मुलीने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. कुटुंबाचा पाठिंबा, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास याच्या जोरावर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ती राज्यात मुलींमध्ये तिसरी आली. हा खडतर प्रवास आहे, महादेववाडी (ता. वाळवा) येथील शेतकर्याची मुलगी गौरी मारुती कदम हिचा. ग्रामीण भागातून घरी अभ्यास करून तिने मिळवलेले यश कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.
गौरीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण महादेववाडी येथे झाले. तिला दहावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण मिळाले. त्यानंतर इस्लामपूर येथे कुसुमताई महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीत 88 टक्के गुण मिळाले. गौरीने डॉक्टर व्हावे, ही वडिलांची इच्छा, पण परिस्थिती आड आली. जमतेम सव्वा-दीड एकर शेती. घरात भाऊ, बहीण, आई, वडील असे कुटुंब. शेतीवर घर खर्च भागत नाही, म्हणून वडील इस्लामपूर एमआयडीसीत कामाला. शेवटी गौरीने पदवीला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. गौरीला पदवीच्या शिक्षणासाठी केंद्राची इन्स्पायर (प्रेरणा) शिष्यवृत्ती मिळाली. तिने पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. ग्रामीण भागातून आल्याने थोडे दडपण होते. वनस्पती शास्त्रातून 91 टक्के गुण घेऊन तिने पदवी पूर्ण केली. पुण्यात राहिल्याने आत्मविश्वास वाढला होता.
गौरी प्राथमिक शिक्षण घेत असताना तिच्या शिक्षकांची मुलगी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झाली. तेव्हाच तिने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. 2021 मध्ये तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी सुरू केली. मात्र, तिला यश आले नाही. त्यानंतर 2023 पासून तिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित केले. पुण्यात महिन्याला 10 ते 15 हजार रुपये खर्च परवडत नव्हता. म्हणून गौरी गावी आली. घरीच अभ्यास सुरू केला. घरची आर्थिक स्थती बेताची.. त्यातच घरात लग्नाची चर्चा सुरू झाल्याने तिच्यावर दडपण आले. ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ती मुलींमध्ये तिसरी आली. तिला 96 वी रँक मिळाली. दुसर्या प्रयत्नात तिला हे यश मिळाले.
गौरी जाणीवपूर्वक सोशल मीडियापासून दूर राहिली. तीन वर्षांत तिने मोबाइलही वापरण्याचे टाळले. दररोज 10 तास अभ्यास केला. वर्तमानपत्रांचे वाचन केले. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडीचा अभ्यास केला. नोट्स काढल्या. लोकसेवा आयोगाच्या प्रश्न पत्रिका सोडवण्याचा सातत्याने सराव केला. मानव संसाधन विषय थोडा अवघड वाटला. मुलाखतीबाबत दडपण होते. त्यासाठी इतर सहकार्यांसोबत सातत्याने चर्चा केली. याचा फायदा झाला. तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन (ध्यान) केले. त्यामुळे मन शांत आणि एकाग्र होण्यास मदत झाली. तुम्ही स्वतःला 100 टक्के देत असाल, तर यश तुमचेच आहे, असे ती सांगते.
परिस्थिती कशीही असो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. इंग्रजी भाषेची अडचण येते, पण त्याची तयारी करावी. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अपयश आल्यानंतर ‘बी प्लॅन’ तयार ठेवला अन् राज्य लोकसेवा आयोगाकडे वळल्याचे तिने सांगितले. अपयश आले की नैराश्य, दडपण वाढते. त्यासाठी व्यावसायिक शिक्षण घेणे गरजेचे आहे. तुमचा ‘बी प्लॅन’ तयार असेल, तर दडपण येणार नाही. आता ‘सारथी’, ‘महाज्योती’ या शासनाच्या योजनेतून प्रशासकीय सेवेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. याचा लाभही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.