

मांजर्डे : खूप कष्टाने द्राक्षाला पर्याय म्हणून पेरू बागेची लागण केली. मात्र चालू वर्षी पेरूचे दर पडल्यामुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे हताश झालेल्या शेतकर्याने पेरूची बागच जेसीबी मशीन लावून काढून टाकली. बाजारात पेरू दर पडल्यामुळे हातनूर (ता. तासगाव) येथील शेतकरी सचिन पाटील यांनी आपली पेरूची बाग काढून टाकली आहे. द्राक्षापाठोपाठ पेरू पिकांमध्ये सुद्धा शेतकर्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
सचिन पाटील या शेतकर्याने आपल्या शेतात एक एकर पेरूची बाग केली होती. मोठ्या कष्टाने ही बाग सांभाळली होती. खते, मजुरी, औषध फवारणी यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. चालूवर्षी तालुक्यात सर्वत्रच पाऊसाने थैमान घातले होते. अतिवृष्टी व सतत पडणार्या पावसामुळे शेतात पाणी साचले होते. या वातावरणात धाडस करून आपल्या पेरू पिकाची छाटणी घेतली. मालही चांगला आला. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे पेरू पिकावरील रोगराई रोखणे शक्य झाले. नाही. खते, औषधे फवारणी करून काही प्रमाणात पेरू वाचले होते, तयार झालेला माल बाजारात विक्रीसाठी पाठविला होता.पण बाजारपेठेत मालाचा दर पडला. घातलेले पैसे सुद्धा हाती लागेनात. माल घरी आणून काय करणार, शेतात झाडांवर असलेला माल काढून बाजारात विकणे परवडेना. तोट्यात शेती करून जास्त नुकसान करून घेण्यापेक्षा पाटील यांनी जेसीबी मशीनच्याद्वारे बागच काढून टाकली.