मिरजेसह जिल्ह्यात आज बाप्पाला निरोप : भव्य मिरवणुका
सांगली/मिरज : पुढारी वृत्तसेवा
आज, मंगळवारी (दि. 17 सप्टेंबर) अनंतचतुर्दशीदिनी जिल्ह्यात विविध ठिकाणी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. मिरजेत सुमारे 250 सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटात निघणार आहे. ग्रामीण भागातील 10 मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे. या मिरवणुकीसाठी शहरात सुमारे एक हजाराहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. शहराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. मंडळांचे स्वागत करण्यासाठी मिरवणूक मार्गांवर स्वागत कक्ष असतील.
शहरात यंदा 470 हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. त्यापैकी पाचव्या, सातव्या, नवव्या दिवशी सुमारे निम्म्या मंडळांच्या श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यंदाही मंडळांनी सजीव देखावे उभारले नव्हते. अनेक मंडळांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील अनेक मंडळांनी सामाजिक उपक्रम राबविले. अनेक मंडळांनी विविध आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, अन्नदान यासह विविध सामाजिक उपक्रम राबविले. बॅलंसिंग व भव्य गणेशमूर्ती अनेक मंडळांनी बसविल्या होत्या.
मंगळवारी अनंतचतुर्दशीदिनी 250 मंडळांच्या गणेशमूर्तींची मोठ्या थाटात मिरवणूक काढण्यात येणार आहे. काही मंडळांच्या मूर्तींचे गणेश तलावामध्ये, तर काही मंडळांच्या मूर्तींचे कृष्णा नदीमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे. गणेश तलाव येथे 6 क्रेन व तराफे असतील. घाटावर तराफ्यांची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी दिली. गरज पडल्यास महापालिका रुग्णालयांत खाटांची व उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. मार्केट, गणेश तलाव, कृष्णा नदी येथे अग्निशमनच्या गाड्या असतील. पोलिस प्रशासनानेही जंगी तयारी केली आहे. मिरवणूक मार्गावर जनसुराज्य शक्ती पक्ष, मिरज भूतपूर्व संस्थानिक पटवर्धन, धर्मवीर संभाजी तरुण मंडळ, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं, दोन्ही शिवसेनेच्या व्यासपीठांवर गणेश मंडळांचे स्वागत केले जाणार आहे.
मिरवणूक मार्गावर व शहरातील काही रस्त्यांवर चौकांमध्ये शंभराहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. काही ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, सुमारे एक हजार पोलिस, गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मुली, महिलांची छेडछाड करणार्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पथके असतील. स्टेशन रस्ता, मार्केट, सराफ कट्टा, गणेश तलाव या मार्गाला जोडणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या मिरवणुकीच्या तयारीचा पालकमंत्री सुरेश खाडे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आढावा घेतला. चौकट करणे
गतवर्षी चालली 25 तास मिरवणूक
गतवर्षी गणेश विसर्जनाची मिरवणूक तब्बल 25 तास सुरू होती. ही मिरवणूक बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यंदाही अशाच भव्य मिरवणुका निघणार आहेत.