सांगली : फटाक्यांच्या आतषबाजीत सोमवारी घरोघरी दिवाळीचे मंगलमय स्वागत झाले. नरकचतुर्दशी म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा दिवस... यानिमित्ताने घरोघरी मांगल्याच्या वातावरणात दीपोत्सव साजरा झाला. पहाटे अभ्यंगस्नानानंतर नवीन कपडे परिधान करून उत्साहात रमलेल्या बालचमूने फटाक्यांची आतषबाजी केली. नंतर फराळाच्या पंगतीने घरातले वातावरण बदलून गेले.
नरकचतुर्दशीस भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केल्याची आख्यायिका आहे. सोमवारी प्रतिवर्षाप्रमाणे घरोघरी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करून दिवाळीची सुरुवात झाली. उटणे लावून, कडुनिंबाची पाने पाण्यात टाकून अभ्यंग स्नान करण्यात आले. दिव्यांच्या सजावटीने घरे लखलखून गेली होती. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावावा, ज्यामुळे लक्ष्मीचे स्वागत होते आणि घरात समृद्धी येते. देवतांसमोर दिवा लावावा. स्वयंपाकघरात दिवा लावून अन्नपूर्णा देवीचे आशीर्वाद मिळवावेत.
तुळशीचे स्थान पवित्र मानले जाते; येथे दिवा लावल्याने धार्मिकता आणि शुद्धता टिकून राहते. अंगण, दुकाने, व्यावसायिक स्थळे आणि घराच्या कोपऱ्यांमध्ये दिवे लावावेत, ज्यामुळे घर-परिवारात सर्वत्र प्रकाश आणि शुभ गोष्टींचे आगमन होते, अशी समाजमनाची धारणा आहे. अशा पारंपरिक गोष्टी दरसाल नरकचतुर्दशीला जपल्या जातात. यानुसार घरोघरी दीपोत्सव साजरा झाला. दारासमोर आकाशकंदील चमकत होते. दारात रांगोळ्या सजल्या होत्या. नवनवीन कपडे घालून बालचमूने फटाक्यांची आतषबाजी सुरू केली. घरा-घरात फराळाच्या पंगती बसल्या होता.
आज लक्ष्मीपूजनाचा उत्साह
घरी, दुकानात, व्यवसायाच्या ठिकाणी सदैव लक्ष्मीदेवतेचा वास असू दे, अशी मनोभावे प्रार्थना करीत लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा आहे. लक्ष्मीपूजन हा सर्वांसाठी पर्वणीचा दिवस. यासाठी सोमवारीच घरोघरी आणि दुकानांमधून लक्ष्मीपूजनाची जय्यत तयारी करण्यात आली.
प्रातःकाळी मंगलस्नान करून केळीच्या खुंटांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णू इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजन करताना चण्याची डाळ देवी लक्ष्मीवर वाहून पूजा झाल्यावर ही डाळ पिंपळाच्या झाडाला वाहिली जाते. घरोघरी लक्ष्मीचे पूजन होतेच, पण व्यापाऱ्यांसाठी ही पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दुकानांमधून लक्ष्मीपूजनासाठी सर्व ती तयारी करण्यात सांगलीतील व्यापारी दंग होते. सराफ पेठ, हरभट रोड, गणपती पेठ, मारुती चौक, विश्रामबाग परिसर, मार्केट यार्ड परिसरातील तसेच उपनगरातील दुकानांमध्ये लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू होती.