

कसबे डिग्रज : वसंतदादा कारखान्यातर्फे सभासदांना दरमहा प्रत्येकी पाच किलो साखर देण्यात येते. वर्षाला एकूण साठ किलो साखर होते, मात्र कारखान्याने गेल्या चार वर्षापासून प्रतिवर्ष केवळ 50 किलो साखर दिली आहे. मागील चार वर्षांची 40 किलो साखर वारंवार मागणी करूनही दिली जात नाही. साखर वाटपामध्येही यावर्षीही गोंधळ आहे. याशिवाय शेअर्ससाठी प्रीमियम घेऊन शेतकर्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करीत मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी आंदोलन केले.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे म्हणाले, शासनाच्या निर्देशानुसार साखर कारखान्याने दहा हजार रुपये शेअरची किंमत पंधरा हजार रुपये केली आहे. त्यासाठी सभासदांना रोखीने पाच हजार रुपये भरण्यास सांगितले आहे. कारखान्याच्या अनेक सभासदांनी पैसे भरून आपला शेअर पंधरा हजार रुपयांचा केला आहे. ज्या सभासदांचा शेअर पंधरा हजार रुपयांचा असेल, त्यांना साखर कारखाना दोनशे रुपयाला पन्नास किलो साखरेचे पोते देणार आहे. हजारो सभासदांच्या कोट्यवधींच्या ठेवी कारखान्याकडे आहेत. जाणीवपूर्वक या ठेवी शेअर्सकडे वर्ग करून घेण्यात आलेल्या नाहीत. साखर कारखान्यांनी वाढीव भाग भांडवलाचा वापर साखर कारखान्याचे विस्तारीकरण, उपपदार्थ युनिटचे विस्तारीकरण किंवा कारखान्यासाठी घेतलेल्या भांडवली कर्जाची परतफेड, यासाठी करायचा आहे. मात्र वसंतदादा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने याबाबत कोणतीही माहिती सभासदांना दिलेली नाही. कारखाना भाड्याने दिलेला असून कारखान्याचे उपपदार्थ बनवण्याचे सर्व युनिट अनेक वर्षांपासून बंद आहेत. असे असताना कारखाना शेअर कॅपिटल वाढवून कोठे गुंतवणूक करणार आहे, याबाबत माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. सभासदांची फसवणूक केली जात आहे. शेतकर्यांना नवीन शेअर्स हवा असल्यास त्याची किंमत तीस हजार रुपये केली आहे. यामध्ये पंधरा हजार रुपये शेअरची किंमत व पंधरा हजार रुपये प्रीमियम आहे, अशी माहिती कारखाना प्रशासन सभासदांना देत आहे. ती पूर्णपणे चुकीची आहे.
याबाबत साखर आयुक्त (पुणे) व साखर संचालक (कोल्हापूर) यांच्याकडे तक्रार केली आहे. कारवाई न केल्यास स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा फराटे यांनी दिला. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.