

पंढरपूर : कार्तिकी यात्रा एकादशीची श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (दि. 2) सपत्नीक होणार आहे. या सोहळ्याकरिता शिंदे हे आज शनिवारी (दि. 1) दुपारी 4.15 वा. पंढरपूर येथे दाखल होणार आहेत. तर 4.30 वा. ‘कार्तिकेची वारी, पंढरीच्या दारी, पर्यावरण रक्षणाचे धडे देई घरोघरी’ या पर्यावरणविषयक जनजागृती उपक्रमाचा समारोप सोहळा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे.
‘कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा एका दिवसावर येवून ठेपला आहे. त्यामुळे पंढरपूर येथे यात्रा सोहळ्यासाठी राज्य भरातून तसेच परराज्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी झाली आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण विषयक जनजागृती उपक्रमाचा समारोप सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे व अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत दि. 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात होणार आहे.
कार्तिकी यात्रेला किमान 10 ते 12 लाख भाविक पंढरीत येतील, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यात्रा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन अधिकारी पंढरपूरात ठाण मांडून बसले आहेत. भाविकांना अधिकाधिक सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर नगरपालिका, पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रयत्नशील आहे. कार्तिकी यात्रेला आलेल्या भाविकांनी मंदिर परिसर, दर्शन रांग, भक्तीसागर, प्रदक्षिणा मार्ग, भक्तीमार्ग गर्दीन फुलून गेला आहे. तर मठ, मंदिर, धर्मशाळा येथ भाविक किर्तन, प्रवचन व भजनात दंग झाले आहेत.