

सांगली : महानगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा टाकणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. खुल्या भूखंडांची स्वच्छता न करून घेतल्यास संबंधित भूखंड मालकांवरही कारवाई होणार आहे. महानगरपालिकेने स्वच्छतेसाठी मिशन मोडवर नियोजन केले आहे, अशी माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली.
महानगरपालिकेच्यावतीने शहराची स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी आणि परिणामकारक करण्यासाठी बुधवारी आयुक्तसत्यम गांधी यांनी बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्तनीलेश देशमुख, उपायुक्त स्मृती पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, स्वच्छता अधिकारी याकुब मद्रासी, अतुल आठवले तसेच सर्व प्रभागांचे स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
उघड्यावर कचरा टाकणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तातडीने भरारी पथके तयार करण्यात येणार आहेत. स्वच्छताविषयक कामकाज अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रत्येक प्रभागात स्वच्छतादूत किंवा स्वयंसेवी संस्था यांची नेमणूक केली जाईल. मोकळ्या भूखंडांच्या स्वच्छतेसाठी भूखंड मालकांना नोटीस देऊनही स्वच्छता न झाल्यास, दंड आकारून त्यानंतर मालमत्तेवर बोजा चढवण्याची कार्यवाही करण्यात येईल.
मुख्य बाजारपेठांमधून सकाळ व सायंकाळच्या सत्रात ई-रिक्षाद्वारे कचरा संकलन केले जाणार आहे. प्रत्येक प्रभागातील अपार्टमेंटमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी स्वतंत्र लहान आकाराचे दोन डस्टबीन ठेवणे बंधनकारक असेल. प्रभागातील शाळांमध्ये पालक बैठका घेऊन स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यात येईल. दर आठवड्याला स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. उघड्यावर कचरा टाकण्याच्या ठिकाणांची सफाई करून, तिथे कचरा टाकणे सक्त मनाई आहे, असे फलक लावले जातील. डास व इतर संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात दर 15 दिवसांनी औषध फवारणी केली जाईल. कचरा संकलन करणार्या घंटागाड्यांना भागात अधिक वेळ देऊन जास्तीत जास्त कचरा संकलन केले जाईल. या बैठकीत घेतलेले निर्णय शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती व परिणामकारकता देतील, असा विश्वास महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी व्यक्त केला.