

आटपाडी : माडगुळे (ता. आटपाडी) येथे 9 ऑक्टोबररोजी सायंकाळी कौटुंबिक वादातून दोन कुटुंबांमध्ये दगड-काठ्यांनी जोरदार हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटातील तिघे जखमी झाले आहेत. दोन्ही कुटुंबांनी आटपाडी पोलिसात परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत.
शिवाजी आनंदा लिंगडे (वय 52) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 9 ऑक्टोबररोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास ते जनावराला चारा घालत असताना पुतण्या सोमनाथ हरिदास लिंगडे याने त्यांच्याकडे पाहून शिवीगाळ केली. याबद्दल जाब विचारण्यासाठी शिवाजी लिंगडे गेले असता, सोमनाथची आई कांताबाई हरिदास लिंगडे तेथे आल्या. त्यांनीही शिवाजी लिंगडे यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर दगडाने हल्ला केला. याप्रकरणी शिवाजी लिंगडे यांनी कांताबाई लिंगडे आणि सोमनाथ लिंगडे यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे.
कांताबाई लिंगडे (वय 52) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 9 ऑक्टोबररोजी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास शिवाजी आनंदा लिंगडे (वय 52) आणि तानाजी शिवाजी लिंगडे (दोघे रा. माडगुळे) हे त्यांच्या घरासमोर आले. त्यांनी शिवीगाळ सुरू केली.
कांताबाई आणि त्यांचा मुलगा सोमनाथ यांनी याला आक्षेप घेतला असता, शिवाजी लिंगडे यांनी हातातील काठीने कांताबाई यांना डाव्या हाताच्या मनगटाखाली व उजव्या हाताच्या बोटाजवळ मारहाण करून जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेला मुलगा सोमनाथ यालाही शिवाजीने काठीने पाठीवर व हातावर मारले. तानाजी लिंगडे याने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ‘तुम्हाला बघून घेतो’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कांताबाई लिंगडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवाजी आनंदा लिंगडे आणि तानाजी शिवाजी लिंगडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या या मारामारीत दोन्ही बाजूचे तिघे जखमी झाले असून, आटपाडी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. अधिक तपास सुरू आहे.