

सांगली : इस्लामपुरातील सुपर टोबॅको कंपनीवर बुधवारी केंद्रीय जीएसटी, गुप्तचर महासंचालनालयाच्या कोल्हापूर शाखेच्या पथकाने छापा टाकला. जीएसटी न भरता तंबाखू उत्पादन व विक्री केल्याच्या संशयावरून ही तपासणी करण्यात आली आहे.
केंद्रीय जीएसटीचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी अभिजित भिसे यांच्या नेतृत्वाखाली सूरज पवार, गुप्तचर अधिकारी अतुल जयस्वाल, सौरभ पवार, हिमांशु आहुजा, अविनाश सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपासणीदरम्यान कंपनीतील संगणक, आर्थिक हिशोबाच्या वह्या, बिलांच्या प्रती आणि विविध कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. या सर्व दस्तऐवजांची बारकाईने छाननी करून नेमकी किती उलाढाल झाली, किती जीएसटी चुकवला, हे उघड होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या छाप्यामुळे इस्लामपुरातील व्यापारी व औद्योगिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. तंबाखू उत्पादन क्षेत्रात जीएसटी टाळण्यासाठी काही कंपन्या विविध मार्ग अवलंबत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई विशेष लक्षवेधी ठरली असल्याचे सांगण्यात आले. सुपर टोबॅको कंपनीविरुद्ध पुढील चौकशी सुरू राहणार आहे.
इस्लामपुरात सुपर टोबॅको कंपनीवर छापा पडल्याचे समजताच इस्लामपूर पोलिस तातडीने तिथे पोहोचले. हे पथक खरेच केंद्रीय जीएसटी गुप्तचर संचालनालयाचे आहे का, याची शहानिशा केली. जीएसटी पथकातील अधिकार्यांचे ओळखपत्र पाहिले. कवठेमहांकाळ येथे नुकतेच एका डॉक्टरच्या घरावर आयकर अधिकारी असल्याचे भासवून भामट्यांनी सोने व रोख रक्कम लंपास केली होती. स्पेशल- 26 या चित्रपटासारखा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर इस्लामपूर पोलिसांनी सुपर टोबॅको कंपनीवर पडलेल्या छाप्याची शहानिशा केली.