

सांगली : महापालिकेकडील बोगस भरतीचे प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी गुन्हे दाखल करा, असे आदेश आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले आहेत. बोगस भरती प्रकाराने महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त यांच्या बनावट स्वाक्षरीने काही तरुणांना नियुक्ती पत्रे दिली आहेत, तर तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीने कर्मचारी ओळखपत्र दिले आहे, अशी तक्रार आहे. नियुक्तीच्या माहितीस्तव आदेशामध्ये तत्कालीन उपायुक्तांची बोगस स्वाक्षरी केल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल होणार आहे.
महापालिका आयुक्त व नगर सचिव विभागाकडे अॅड. माणिक तेग्गी यांनी तक्रार केली आहे. यात म्हटले आहे, एका संशयिताने महापालिकेत नोकरी लावतो म्हणून अनुराधा कांबळे यांच्याकडून 5 लाख, सनत कांबळे यांंच्याकडून 3.25 लाख, आदित्य बनसोडे यांच्याकडून 80 हजार, विकी कांबळे यांच्याकडून 1 लाख अशी रक्कम घेतली आहे. त्यांना संबंधित संशयिताने माजी आयुक्त व उपायुक्तांच्या बनावट सही-शिक्यानिशी नियुक्तीपत्रे व ओळखपत्रेही दिली आहेत. याआधारे तरुणांनी काही महिने मिरजेतील आरोग्य विभागात कामही केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची आयुक्त सत्यम गांधी यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी महापालिकेच्या आस्थापना विभागामार्फत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.