सांगली : पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सांगलीच्या विकासाची दृष्टी आहे. पाच वर्षे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांना आमदार म्हणून निवडून द्या. ते निश्चितच चांगली कामगिरी करतील, असा विश्वास काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
सांगली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ कर्नाळ (ता. मिरज) येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, पृथ्वीराज पाटील यांच्या पाच वर्षांच्या कामाचा अहवाल पाहूनच त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सांगली मतदारसंघाच्या समस्या काय आहेत व त्या सोडविण्यासाठी काय केलं पाहिजे, भविष्यात सांगली पंचक्रोशी कशी असावी, याबाबत त्यांनी वैयक्तिक जाहीरनामा तयार केला आहे, त्याप्रमाणे ते निश्चितच सांगलीचा विकास करू शकतात.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, कर्नाळकरांनी मला गेल्या निवडणुकीत भरघोस मतदान केले. कर्नाळसाठी रिंगरोडला सव्वाकोटी आणि अंबरसो दर्ग्यासाठी सात लाखांचा निधी महाआघाडी सरकार असताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिला. नगरविकास खात्याकडून दहा कोटींचा निधी आणून अनेक कामे करता आली. यासाठी आमदार डॉ. विश्वजित कदम यांचे सहकार्य लाभले. अपक्षाला मत म्हणजे भाजपला मत याची जाणीव ठेवून काँग्रेसलाच साथ द्या. विक्रम कदम यांनी स्वागत केले. सरपंच संध्या कांबळे, उपसरपंच नसीम चौगुले, युवराज पाटील, राष्ट्रवादीचे राजू पाटील, गणेश घोरपडे, रघुनाथ घोरपडे, महावीर पाटील, ग्रामपंचायत सदस्या आदिती कदम, सुनीता नरळे, प्रा. नझीर चौगुले, कुणाल माने, वैभव बंडगर आदी उपस्थित होते. नासीर चौगुले यांनी आभार मानले.