मिरज : पुढारी वृत्तसेवा
आवाजाची मर्यादा झुगारून डीजेचा दणदणाट करणार्या मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार वादवादीचा प्रकार घडला. यावेळी एका मंडळाने विसर्जन मिरवणूक थांबविण्याचा निर्णय घेतला. परंतु पुन्हा मंडळाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर विसर्जन मिरवणूक सुरू करण्यात आली. तसेच दोन मंडळांमध्ये वाद सुरू झाल्याने त्यांना हुसकावून लावताना झालेल्या सौम्य लाठीमारामध्ये अल्पवयीन मुलासह एक तरुणी जखमी झाली.
मिरजेमध्ये विसर्जन मिरवणुकीत लेझर, प्लाजमा आणि शारप्यावर बंदी घालण्यात आली होती. तसेच डीजेच्या आवाजावरदेखील मर्यादा घालण्यात आली होती. परंतु काही मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून तसेच डीजे चालकाकडून आवाजाची मर्यादा ओलांडून डीजेचा दणदणाट करण्यात आला. पोलिसांनी काही मंडळांना आवाज कमी करण्याची सूचना दिली. परंतु गणेश मंडळांनी पोलिसांचे आदेश झुगारून डीजेचा दणदणाट केला. त्यामुळे पोलिस आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी झाली.
एका मंडळावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने संतापलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणूक थांबविण्याचा निर्णय घेतला. सुमारे 50 कार्यकर्त्यांनी विसर्जन मार्गावरच ठिय्या मारत मिरवणूक थांबविण्याचा निर्णय घेतला. परंतु पोलिसांनी कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर विजर्सन पुन्हा सुरू झाली. तसेच वारंवार सूचना देवून देखील डीजेचा आवाज कमी न केल्याने पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनी डीजे चालकावर कारवाईचा निर्णय घेतला. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडल्याचे पाहावयास मिळाले.
तसेच गणेश तलाव येथे शेवटी गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी दोन मंडळांमध्ये चढाओढ सुरू होती. त्यामुळे एका मंडळाने गणेश तलावात मूर्ती नेवूनदेखील विसर्जन केले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी जबरदस्तीने गणेश मूर्तीचे विजर्सन करण्यास कार्यकर्त्यांना भाग पाडले. त्यावेळी दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामध्ये एका अल्पवयीन मुलासह तरुणी जखमी झाली आहे.
मिरजेत मंगळवारी सकाळी 8 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. बुधवारी दुपारी 1 वाजेपर्यंत विसर्जन सुरू होते. त्यामुळे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांकडून सलग 29 तास खडा पहारा सुरू होता. तसेच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोखर दोघेही विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते.