विटा : पुढारी वृत्तसेवा
विट्यात किरकोळ वादातून एका युवकाचा निर्घृण खून झाला. मृत झालेल्या तरूणाचे नाव चिक्या उर्फ प्रीतम संजीव भिंगारदेवे असून, या प्रकरणी संशयित आराेपी तात्यासो पवार यास विटा पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, भरदिवसा निर्घृण खून झाल्याने विटा परिसरात खळबळ उडाली आहे.
येथील विटा-मायणी रस्त्यालगत असणाऱ्या एका दारूच्या दुकानासमोर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका युवकाचा धारदार शस्त्राने खून झाला. या घटनेने विटा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विट्यातील चिक्या उर्फ प्रीतम संजीव भिंगारदेवे आणि तात्यासो साहेबराव पवार यांच्यात काही कारणावरून वादावादी सुरू झाली. या वादातून तात्या पवार याने आपल्याजवळ असणाऱ्या धारदार शस्त्राने चिक्या उर्फ प्रीतम भिंगारदेवे याच्यावर खुनी हल्ला चढवला. या हल्ल्यात चिक्या उर्फ प्रीतम भिंगारदेवे जखमी झाला.
त्यानंतर नागरिकांच्या मदतीने जखमीला विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु चिक्या उर्फ प्रीतमचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या खळबळजनक खुनाच्या घडनेनंतर विटा पोलिसांनी तातडीने संशयित आरोपी तात्यासो पवार याला ताब्यात घेतले. या हल्ल्यात आणखी कोणी हल्लेखोर सामील आहेत का ? याचा तपास सुरू केला आहे.