मिरज : पुढारी वृत्तसेवा
मिरज शहरातून कत्तलीसाठी जनावरे वाहून नेणारा टेम्पो मिरज शहर पोलिसांनी छापा टाकून पकडला. यावेळी 36 जर्सी खोंड आणि चार रेडकांची सुटका करण्यात आली. तर टेम्पोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक जनावरे भरल्याने तीन जर्सी खोंडांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, पोलिसांचा छापा पडताच टेम्पो चालकाने मात्र घटनास्थळावरून पलायन केले. शहरातून या टेम्पो मधून क्षमतेपेक्षा अधिक जनावरे भरून ती कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती मिरज शहर पोलिसांना मिळाली होती.
यानंतर संबंधित टेम्पो शास्त्री चौकातून वेताळबानगरकडे जात असताना पोलिसांनी छापा टाकून पकडला. पोलिसांनी टेम्पो अडवताच चालकाने टेम्पो सोडून पलायन केले. यावेळी टेम्पोमध्ये भरण्यात आलेले जर्सी खोंड व रेडकू आणि टेम्पो असा दोन लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यावेळी टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोमध्ये तीन मृत जर्सी खोंड आढळून आले. क्षमतेपेक्षा जादा जनावरांची टेम्पोत भरती केल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. यावेळी अज्ञात चालका गुन्हा दाखल करण्यात आला आहे.