‘सागरेश्वर’बाहेर पुन्हा बिबट्याचे दर्शन! | पुढारी

‘सागरेश्वर’बाहेर पुन्हा बिबट्याचे दर्शन!

देवराष्ट्रे : पुढारी वृत्तसेवा

सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात बिबट्या दाखल झाल्यापासून काही दिवसांच्या अंतराने अभयारण्याबाहेरही बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे अभयारण्याशेजारील शेतकर्‍यांमध्ये कमालीची भीती दिसून येत आहे.

शनिवारी रात्री सागरेश्वरच्या घाटात पुन्हा बिबट्या दिसून आला आहे. देवराष्ट्रे-ताकारी रस्त्यावर सागरेश्वर मंदिराच्या जवळच भर रस्त्यात बिबट्या चारचाकीसमोर आल्याचे पाहावयास मिळाले आहे. गाडीसमोरून शांतपणे चालत बिबट्या अभयारण्याकडील बाजूस गेल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रशांत जमदाडे यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी, देवराष्ट्रे येथील प्रशांत जमदाडे शनिवारी रात्री देवराष्ट्रेकडे येत असताना सागरेश्वर मंदिराच्या नजीकच बिबट्या त्यांच्या चारचाकी गाडीसमोर आला. बिबट्या शांतपणे चालत अभयारण्याच्या दिशेने चालला होता. केवळ 40 ते 50 फुटांच्या अंतरावरून बिबट्या शांतपणे चालत अभयारण्याच्या कुंपणाच्या दिशेने गेला. सागरेश्वर अभयारण्यात बिबट्या दाखल झाल्यापासून तो अनेकदा अभयारण्याच्या बाहेरही दिसून आलेला आहे. अभयारण्याच्या पश्चिम बाजूकडील कुंपनाशेजारी वानरांचा पाठलाग करताना रात्रीच्या वेळीही बिबट्या दिसलेला आहे.सागरेश्वरच्या घाटातही बिबट्या दिसण्याच्या घटना अनेकदा घडलेल्या आहेत. त्यामुळे अभयारण्याच्या कुंपणाशेजारील शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण दिसून येत आहे.

Back to top button