सांगली/तासगाव; पुढारी वृत्तसेवा : तासगाव येथील सावकार जयश्री ऊर्फ जया मुसळे (रा. पागा गल्ली ) हिला पोलिसांनी अटक केली. दहा हजारांच्या कर्जापोटी 25 हजार वसूल केल्यानंतरही दंड म्हणून 70 हजार रुपयांच्या वसुलीसाठी तगादा लावला होता. त्यामुळे फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांच्या सावकारी प्रतिबंधक सेल आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.
पोलिसांनी सांगितले, तासगाव येथील अभिजित मोहन साळुंखे याने सावकारांच्या मनमानीमुळे आपली पिळवणूक होत असल्याची व्यथा मांडली होती. त्याची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी चौकशी व कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
साळुंखे याने 2019 जयश्री मुसळे हिच्याकडून 10 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्या कर्जापोटी ऑगस्ट 2021 पर्यंत 25 हजार 750 रुपयांची वसुली तिने केली. त्यानंतर व्याज दरमहा दिले नसल्याने प्रत्येक दिवसाला 250 रुपयांचा दंड आकारला. या दंडाची एकूण रक्कम 70 हजार रुपये तिने मागणी केली. वसुलीसाठी फिर्यादीचा मित्र मोहन कांबळे याच्या मध्यस्थीने महिलेने तगादा लावला होता. कांबळे याने मध्यस्थी केल्यानंतर महिलेने 30 हजार कमी केल्याचे सांगून 40 हजारांची मागणी केली होती.
सावकारांच्या विरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याची माहिती वृत्तपत्रातून वाचल्यानंतर साळुंखे यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. मुसळे हिच्याविरोधात गुन्हा दाखल करुन सावकारी प्रतिबंधक सेलच्या पथकाने तिला अटक केली. या कारवाईत तिच्या घरात दोन कोरे धनादेश, सावकारीच्या हस्ताक्षरातील नोंदीच्या दोन वह्या, साडेपाच हजार रुपये आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सावकारी प्रतिबंधक सेलचे पोलिस उपनिरीक्षक आर. एफ. मिरजे, एस. जी. चव्हाण, एस. एम. पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सहाय्यक फौजदार एस. एम माळी, एस. ए. मुळीक, हवालदार ए. एस. अवताडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला. या सावकार महिलेकडून आणखी कोणाची पिळवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जयश्री मुसळे हिच्याकडून पोलिसांनी जप्त केलेल्या वहीच्या नोंदीमध्ये सुमारे 70 ते 80 जणांना बेकायदेशीरपणे कर्ज दिल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. त्यामुळे मुसळे हिने सावकारीच्या माध्यमातून अनेकांची पिळवणूक केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्या द़ृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.