Madan Patil Sangli : मै हूं डाॅन – मुत्सद्दी राजकारणी मदन पाटील | पुढारी

Madan Patil Sangli : मै हूं डाॅन - मुत्सद्दी राजकारणी मदन पाटील

प्रा. डॉ. शिकंदर जमादार : राज्याच्या राजकारणात स्वत:ची वेगळी क्रेझ निर्माण करणारे, कार्यकर्त्यांना सातत्याने बळ देणारे, त्यांच्याशी केलेली कमिटमेंट पाळणारे आणि कार्यकर्त्यांच्या सतत गराड्यात राहणारे नेतृत्व म्हणजे माजी मंत्री मदनभाऊ पाटील (Madan Patil Sangli).

मुत्सद्दी राजकारणी, धाडसी, आक्रमक आणि जिगरबाज नेतृत्व, तसेच नजरेच्या धाकाने समोरच्याला शांत करणारे नेतृत्व असा लौकिक असलेले जिल्ह्याचे नेतृत्व म्हणजे मदनभाऊ पाटील. त्यांची गुरुवारी जयंती. त्यानिमित्त (स्व.) मदनभाऊ पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढावा..!

(स्व.) मदनभाऊ पाटील (Madan Patil Sangli) यांची जिल्ह्याच्या राजकारणात आदरयुक्त आणि जिगरबाज नेतृत्व म्हणून ओळख होती. मदनभाऊंच्या राजकारणाची सुरुवात सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून झाली. मदनभाऊंनी अध्यक्षपदाच्या कार्यकालात काँग्रेस पक्षसंघटनेत युवकांची फळी निर्माण केली. युवक काँग्रेसचे संघटन करीत असतानाच वयाच्या 25 व्या वर्षी सांगलीच्या इतिहासात प्रथमच सर्वात तरुण नगराध्यक्ष झाले.

Madan Patil Sangli : शब्द पाळणारा नेता

युवक काँग्रेसचे अध्यक्ष असल्याने आपण नगराध्यक्ष व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र वसंतरावदादांनी भालेंद्र दडगे यांना नगराध्यक्ष करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे एका वर्षानंतर त्यांना नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली. नगराध्यक्षपदाची एक वर्षाची मुदत संपल्यानंतर भाऊ राजीनामा देणार नाहीत, असे बर्‍याच लोकांना वाटत होते. परंतु भाऊंनी ज्या दिवशी एक वर्षाची मुदत संपली त्या दिवशी तत्कालीन पक्षप्रतोद राजाभाऊ जगदाळे यांचेकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.

सांगली जिल्ह्याच्या राजकारणाची चर्चा मदनभाऊंशिवाय सुरू होत नाही आणि संपतही नाही. प्रारंभी सांगली नगरपालिका नंतर तीन शहरांच्या महापालिकेती अनभिषिक्त सत्ताधीश असणारा हा नेता मात्र आपण ‘मास लिडर’ होण्याच्या मोहात कधीच पडला नाही. महापालिकेसारख्या आजच्या अत्यंत अस्थिर, आव्हानात्मक सत्तेत आपली मजबूत पकड असणारा हा जिल्ह्यातील एकमेव नेता होता.

२५ वर्षे महापालिकेत सत्ता

मधल्या काळात राज्यातील दिग्गज नेते अशी ओळख असलेल्या ना. जयंत पाटील यांनी सर्व नेत्यांना एकत्रित करुन महाआघाडीचा प्रयोग करुन सत्ता आणली, मात्र त्यांना राजकीय कसरत करावी लागली. त्यांना अपेक्षित असणारी कमांडसुध्दा पाच वर्षे ठेवता आली नाही. गेल्या अडीच ते तीन वर्षातील महापालिकेतील राजकीय घडामोडी पाहिल्या तर मदनभाऊंनी ही कसरत तब्बल 25 वर्षे कशी केली असेल, असा प्रश्न या निमित्ताने अनेक नेत्यांना पडतो.

सन 2018 मध्ये महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मदनभाऊंची उणीव प्रकर्षाने जाणवली. तिकीट वाटपाचा गोंधळ शेवटच्या क्षणापर्यंत चालू राहिला. मदनभाऊंच्या अनुपस्थितीत गटबाजीला उधाण आले आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला दारुण पराभव पत्करावा लागला. मदनभाऊंना कार्यकर्त्यांची पारख होती. राजकारणात सर्व कार्यकर्त्यांना एकाचवेळी खूश ठेवता येत नसते. तरीही कार्यकर्त्यांवर भाऊंची विलक्षण पकड होती.

भाऊ अत्यंत कमी बोलत मात्र त्यांच्या शब्दात जरब होती. दिलेला शब्द पाळणारा हा नेता होता. गल्लीतील सामान्य कार्यकर्त्यांपासून ते तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, ना. अजित पवार अशा राज्यस्तरावरील अनेक नेत्यांच्या बरोबर त्यांचे अत्यंत सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे जिल्हास्तरावरील अनेक विकासांची कामे करण्यास त्यांची मदत झाली.

भुविकास बँकेला उर्जितावस्था

नगराध्यक्ष म्हणून सांगलीचे नेतृत्व करीत असताना त्यांनी शहरातील अनेक विकासकामांना गती दिली. सांगली संस्थानचे तत्कालीन अधिपती राजे चिंतामणराव पटवर्धन यांचा पूर्णाकृती पुतळा राजवाडा चौकात उभा केला. ते जरी वसंतदादांचे नातू, विष्णूआण्णांचे चिरंजीव असले तरी स्वकर्तृत्वातून पुढे आलेले नेतृत्व होते.

नगरपालिकेच्या राजकारणात यशस्वी ठरल्यानंतर 2015 पर्यंतच्या कार्यकालात 5 वर्षांचा कार्यकाल वजा केल्यास, मदनभाऊंची एकहाती सत्ता होती.

सांगली नगरपालिकेनंतर त्यांनी भूविकास बँकेचे अध्यक्षपद स्वीकारले. या बँकेला उर्जितावस्था प्राप्त करुन दिली. सांगलीत कुठल्याही स्पर्धा असोत, त्यांच्या मदतीला भाऊंचा मदतीचा हात पुढे यायचाच! स्पर्धेच्या नियोजनापासून ते पारितोषिक वितरणापर्यंत जबाबदारी भाऊंची. अडचण आली की ते स्वत: मदत करत.

काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत आहे, पण मदनभाऊंसारखे खमके नेतृत्व पक्षात नाही. सांगलीसह जिल्ह्यातील चार तालुक्यांतील कृष्णा, वारणा काठाला महापुराने तडाखा दिला. यात प्रशासनाची यंत्रणा पूरग्रस्तांपर्यंत लवकर पोहोचली नाही.

मदनभाऊं सारखा नेता आज असता तर त्यांनी पूरग्रस्तांना मोठा आधार दिला असता. कार्यकर्त्यांना बळ देणारा, त्यांच्याशी केलेली कमिटमेंट पाळणार्‍या, कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणार्‍या या नेत्याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Back to top button