grapes farming sangli : अवकाळी छाया..! 50 हजार हेक्टर द्राक्षशेतीचे नुकसान - पुढारी

grapes farming sangli : अवकाळी छाया..! 50 हजार हेक्टर द्राक्षशेतीचे नुकसान

तासगाव : दिलीप जाधव : grapes farming sangli : गेल्या महिनाभरातील अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील 50 हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षे रोगाला बळी पडून, कुजून किंवा गळून मातीमोल झाली आहेत. अस्मानी संकटात जिल्ह्यात द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांचे आतापर्यंत दीड हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. उर्वरित 30 हजार हेक्टर क्षेत्रावरील जवळपास आणखी दीड हजार कोटी रुपयांच्या द्राक्षांवर अवकाळी पावसाच्या संकटाच्या ढगांची काळी छाया पसरली आहे.

जिल्ह्यात 79 हजार 440 हेक्टर क्षेत्रावर विविध जातीच्या द्राक्षबागा आहेत. अंदाजे 23 हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षांपासून बेदाणा तयार केला जातो, तर 56 हजार क्षेत्रावरील द्राक्षे बाजारपेठेत जात असतात. बाजारपेठेत

जाणार्‍या द्राक्षांपैकी जवळपास 11 हजार हेक्टरवरील द्राक्षांची निर्यात होते. तसेच 45 हजार हेक्टरवरील द्राक्षे देशांतर्गत बाजारपेठेत जातात. जिल्ह्यात दरवर्षी द्राक्ष विक्रीतून 5 हजार कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल होते.

grapes farming sangli : द्राक्षांचा पीकछाटणी हंगाम दरवर्षीच्या तुलनेत दीड महिना उशिराने सुरू

यंदा द्राक्षांचा पीकछाटणी हंगाम दरवर्षीच्या तुलनेत दीड महिना उशिराने सुरू झाला. सप्टेंबर अखेरीस पीकछाटण्या सुरू होऊन ऑक्टोंबरच्या अखेरीस 79 हजार 440 हेक्टर क्षेत्रावरील पीक छाटणी पूर्ण झाली. या वर्षीचा हंगाम भरात आला असतानाच गेल्या महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाचे आगमन झाले. त्याचा मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांना फटका बसला.

आता देखील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पाऊस आहे. यामुळे पोंगा अवस्थेत असलेली द्राक्षे डाऊनी रोगास बळी पडली आहेत. जिल्ह्यात 25 ते 30 टक्के द्राक्षबागा डाऊनी रोगाने गेल्या.

पोंगा अवस्थेतून वाचलेल्या बहुतांशी द्राक्षबागेतील द्राक्षे फुलोरा अवस्थेत असताना आलेल्या पावसात कुजून व गळून गेली.

तर 25 टक्केच्या आसपास बागेतील द्राक्षबागेतील द्राक्षघड कुजून गळून पडले आहेत. याव्यतिरिक्त ज्या बागेतील द्राक्षे विक्रीस तयार आहेत, त्या द्राक्षांना पावसामुळे तडे जाऊ लागले आहेत.

रोगामुळे शेतकरी बेजार

अवकाळी पावसात आलेले डाऊनी, करपा आणि बुरीसारखे रोग तसेच द्राक्षगळ व गळकुज यामुळे जिल्ह्यात 79 हजार 440 हेक्टर क्षेत्रापैकी अंदाजे 50 हजार हेक्टरच्या आसपास क्षेत्रावरील द्राक्षे मातीमोल झाली. अवकाळी पावसाच्या तडाख्यात अंदाजे 2 लाख टन द्राक्षे मातीमोल झाली. या अवकाळीत वाया गेलेल्या द्राक्षांची बाजारभावातील किंमत सरासरी दीड हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.

याशिवाय आजमितीस जवळपास 29 हजार 440 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षे बागेत आहेत. पण वातावरण मात्र अजूनही ढगाळ आहे. वेधशाळेने चार – पाच दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. जर पाऊस पडला तर द्राक्षबागेतील द्राक्षे राहणार की मातीमोल होणार, याची शाश्वती कुणालाच नाही.

एकूणच परिस्थिती अवकाळी पावसामुळे पाहता या वर्षीचा द्राक्षहंगाम सर्व शेतकर्‍यांसाठी कर्दनकाळ बनला आहे. आता हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाच आहे, परंतु कर्ज काढून, व्याजाने पैसे घेऊन खते, औषधे, मजुरांवर केलेला खर्च वाया जाण्याच्या भीतीने द्राक्षबागायतदार हवालदिल झाले आहेत.

गेल्या दोन वर्षात कोरोनाने द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांना आर्थिक संकटाच्या खाईत लोटले. आता अवकाळी पावसाने जिल्ह्यातील द्राक्षशेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या दोन – तीन वर्षात 50 टक्के द्राक्षबागा शेतकरी काढून टाकतील. अस्मानी संकटातून शेतकरी आणि द्राक्षशेती वाचवायची असेल, तर शासनाने अवकाळी पावसाने द्राक्षबागांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत. तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आज द्राक्षे मातीमोल होत आहेत परंतु भविष्यात द्राक्षशेती मातीमोल व्हायला वेळ लागणार नाही.
– जगन्नाथ मस्के
माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघ.

Back to top button