तासगाव तहसीलचा खासगी उमेदवार लाचलुचपतच्या जाळ्यात | पुढारी

तासगाव तहसीलचा खासगी उमेदवार लाचलुचपतच्या जाळ्यात

तासगाव : पुढारी वृत्तसेवा

तासगाव तहसीलदार कार्यालयात केस चालवण्यासाठी चार हजार रुपये लाच घेताना पतंग कसबे या खाजगी उमेदवारास बुधवारी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. तहसीलदार कार्यालयातील खाजगी व्यक्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होण्याची दुसरी वेळ आहे.

पतंग कसबे अनेक वर्षांपासून तहसीलदार कार्यालयात उमेदवार म्हणून काम करीत होते. किरकोळ स्वरुपाचे गुन्हे तहसीलदार अथवा नायब तहसीलदार यांच्या समोर चालतात. सदर गुन्ह्यांची कागदपत्रे तयार करणे आणि विविध प्रकारच्या केसेस अधिकाऱ्यांसमोर चालवणे ही सर्व कामे पतंब कसबे हेच करीत होते.

पतंग कसबे यांनी नायब तहसीलदारांसमोर केस चालवण्यासाठी एका व्यक्तीकडे चार हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत संबंधित व्यक्तिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी बुधवारी तहसील कार्यालयात सापळा लावला. शहानिशा करण्यासाठी तक्रारदारास कसबेकडे पाठविले. यावेळी कसबे याने केस चालवण्यासाठी चार हजार रुपये द्या, अशी मागणी केली.

तक्रारदाराला चार हजार रुपये घेऊन कसबे यांच्याकडे पाठविण्यात आले. पैसे घेताना कसबे याला रंगेहाथ पकडण्यात आले. गेल्या काही महिन्यातील तासगावच्या तहसीलदार कार्यालयातील खाजगी इसमावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई होण्याची ही दुसरी वेळ आहे.

Back to top button