सांगली : संपामुळे अधिकच रुतले एसटीचे चाक | पुढारी

सांगली : संपामुळे अधिकच रुतले एसटीचे चाक

सांगली; गणेश कांबळे 

शासनाकडे विलीनीकरण करावे, यासह अन्य मागण्यांसाठी एस.टी.च्या विविध कर्मचारी संघटनांनी 8 नोव्हेंबरपासून संप पुकारला. ऐन दिवाळीत संप पुकारल्याने एस.टी.ला मोठा फटका बसला. दि. 22 नोव्हेंबरपर्यंत वाटाघाटीतून शासनाने वेतनवाढीचा निर्णय जाहीर केला. कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्याचा इशारा देण्यात आला आहे. संपावरील निम्मे कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. मात्र या घडामोडीत 15 दिवसात सांगली विभागाला सुमारे 15 कोटींच्या उत्पन्नाला मुकावे लागले. त्यामुळे तोट्यात असणार्‍या एस.टी.चे चाक संपामुळे अधिकच रुतले आहे.

दिवाळीच्या कालावधीत एस.टी.ची घोडदौड जोरात असते. याच कालावधीत एस.टी.चे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी एकत्रित येत संप पुकारला. दिवाळीतच प्रवाशांचे हाल झाले. शासनाशी वाटाघाटी सुरू झाल्या. परंतु निर्णय न झाल्याने संप सुरूच राहिला. अखेर संप मोडीत काढण्यासाठी शासनाने वडाप गाड्यांना बसस्थानकात परवानगी देत प्रवासी वाहतूक सुरू केली. तरीही संप मागे न घेतल्याने शासनाने नोकरभरती करीत कर्मचार्‍यांवर कारवाईचे हत्यार उपसले. शासन आणि कर्मचारी यांच्यातील वादात काही तालुक्यात बसेसवर दगडफेक करण्यात आली. एस.टी. गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

संपाचे केंद्र खानापूर-आटपाडी आगार

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली संप सुरू झाला होता. त्यामुळे खानापूर व आटपाडी आगार हे संपाचे प्रमुख केंद्र बनले होते. जिल्ह्यात संपाची धार कमी असली तरी या दोन आगारात 100 टक्के संप पुकारण्यात आला होता. त्यामुळे आगारातून बाहेर पडणार्‍या बसेसवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली होती. नंतर सांगली आगारासमोर आंदोलनाची तीव्रता वाढली. येथे भाजपाच्या नेत्यांनी नेतृत्व करीत संप सुरू ठेवला.

कारवाईमुळे 2200 कर्मचारी कामावर

संपाची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात येताच शासनाने नवीन नोकर भरती करीत कर्मचार्‍यांवर कारवाई सुरू केली. काहींना सेवासमाप्तीची नोटीस पाठविली. जिल्ह्यात 10 आगारातील 4 हजार कर्मचारी संपावर होते. सेवासमाप्तीची कारवाई सुरू झाल्यानंतर कर्मचारी संघटनांमध्ये फूट पडली. नंतर काही कर्मचारी कामावर परतू लागले. आज अखेर 2200 कामगार कामावर हजर झाले आहेत. मात्र अजूनही काही कामगार विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असून, संप सुरूच आहे. अजूनही सुरळीत सेवा सुरू झाली नाही. मात्र कर्मचारी कामावर हजर झाल्याने 15 दिवसानंतर जिल्ह्यात एस. टी. बसेस धावू लागल्या आहेत.

शासनाने वेतन वाढीचा प्रश्न सोडविल्यामुळे उर्वरित कर्मचार्‍यांनीही कामावर हजर व्हावे, असे आवाहन विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी केले आहे.

विटा आगारास पावणे दोन कोटींचा फटका; 16 कर्मचारी निलंबित

विटा आगारात अजूनही संप सुरू आहे. येथे दररोज 28 ते 30 फेर्‍या बंद राहत आहेत. यातून दररोज 7 लाखांचे उत्पन्न बुडत आहे. खानापूर – भिवघाट मार्गावर धावणार्‍या बसेसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे शासनाने 16 जणांना निलंबित केले, तर 12 कंत्राटी कर्मचार्‍यांची सेवासमाप्ती केली. सत्तर टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.

तासगाव आगाराला 1 कोटीचा फटका

तासगाव आगारातील 315 कर्मचारी संपात सहभागी झाले होते. या आगाराचे 1 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. सध्या संपाची तीव्रता कमी होत आहे. तरी प्रवाशांअभावी गाड्या रिकाम्या फिरत आहेत.

इस्लामपूर आगाराला 3 कोटींचे नुकसान

संप कालावधीत इस्लामपूर आगारातून 200 फेर्‍या रद्द करण्यात आल्या. तीन कोटींचे उत्पन्न बुडाले. दोन बसेसवर दगडफेक करून फोडण्यात आल्या. त्यांचे नुकसान झाले.

एस.टी. आली रुळावर

पंधरा दिवसांच्या संपानंतर शासनाने संप मोडीत काढण्यासाठी कारवाईचे हत्यार उपसले. काहींना निलंबित केले, तर काहींची सेवासमाप्ती केली. कारवाईच्या भीतीमुळे कर्मचार्‍यांनी कामावर हजर राहण्यास सुरुवात केली. त्यामुळे एस.टी. रस्त्यावर धावू लागली. हळूहळू प्रवासीही बसस्थानकात येऊ लागले आहेत. चार हजार पैकी 2200 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. उर्वरित कर्मचार्‍यांनीही हजर व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लवकरच एस.टी. पूर्णपणे सुरळीत होईल, असे सांगण्यात येत आहे.

संप सुरूच राहील : मोहिते

सांगलीतील एस.टी. कामगारांचे नेते अविनाश मोहिते म्हणाले, शासनाने वेतनवाढीचा मुद्दा मान्य केल्यानंतर या आंदोलनातून भाजपाने संपातून माघार घेतली. काही कर्मचारी हे कामावर हजर झाले आहेत. परंतु आझाद मैदानावर विलीनीकरणाच्या मुद्द्यावर संप सुरूच आहे. त्यामुळे पूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.

346 जण निलंबित, 81 जणांची सेवासमाप्ती

सांगली विभागातसुद्धा कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले. कंसात सेवा समाप्त केलेल्या कर्मचार्‍यांची संख्या : यामध्ये सांगली – 27 (13), मिरज – 43 (11), इस्लामपूर – 67 (0), तासगाव – 14 (11), विटा – 16 (15),जत – 38(20), आटपाडी – 82 (0), कवठेमहांकाळ – 8 (6), शिराळा – 31 (2), पलूस – 4 (3), विभागीय कचेरी – 5 (0), विभागीय कार्यशाळा – 11(0)

सांगली विभागात 15 कोटींचे नुकसान

ऐन दिवाळी एस. टी. कर्मचार्‍यांनी संपाचा निर्णय घेतल्यामुळे एस.टी.ची वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाचा दिवस भाऊबीजेला मोठा तोटा झाला. संपाच्या काळात सुमारे 50 लाख किलोमीटर धावणार्‍या फेर्‍या रद्द कराव्या लागल्या. आतापर्यंत 15 कोटीचे उत्पन्न बुडाल्यामुळे एस.टी.ला सर्वाधिक तोटा असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कर्मचार्‍यांनी ताताडीने कामावर हजर व्हावे, असे आवाहन विभाग नियंत्रक भोकरे यांनी केले आहे.

Back to top button