सांगली : बेफिकिरीमुळे कोरोना मारू शकतो पुन्हा उसळी | पुढारी

सांगली : बेफिकिरीमुळे कोरोना मारू शकतो पुन्हा उसळी

सांगली : उद्धव पाटील

कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. जनजीवन पूर्ववत झाले आहे. सण, समारंभ, मेळावे, कार्यक्रमांना पूर्वीसारखी गर्दी होत आहे. मात्र, यात कोरोना प्रतिबंधक नियम धाब्यावर बसवले जात आहेत. विनामास्क वावर सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन तर होताना दिसतच नाही. युरोपात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा कहर सुरू असताना सांगली जिल्ह्यात मात्र कोरोना जणू हद्दपार झाल्यागत सारा व्यवहार सुरू आहे. बेफिकिरी वाढल्यास कोरोना पुन्हा उसळी मारू शकतो.

युरोपात कोरोनाची चौथी लाट सुरू आहे. बुधवारी जर्मनीत एका दिवशी 52 हजार 826 नवे रुग्ण आढळले. बेल्जियममध्ये 12 हजार 388, ऑस्ट्रियामध्ये 14 हजार 416, नेदरलँडमध्ये बुधवारी एका दिवशी 20 हजार 760 नवे रुग्ण आढळले. युरोपात कोरोनाचा संसर्ग जोरात आहे. त्यामुळे इकडे आपल्याकडेही ‘कोरोना’बाबत दक्ष असणे आवश्यक आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट डिसेंबरमध्ये शक्य असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तिसर्‍या लाटेत कोरोनाचा प्रभाव हलका असेल, पण दक्षता आवश्यक आहे,

असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांची जबाबदारी वाढत आहेे. मात्र, नागरिक जबाबदारीने वागत नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात तीन लाखांवर व्यक्तींनी घेतला नाही एकही डोस कोरोना प्रतिबंधासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर वापर या त्रिसूत्रींचे पालन सुरूच ठेवले पाहिजे. त्याचबरोबर लसीकरणही महत्त्वाचे आहे.

जिल्ह्यात अठरा वर्षांवरील व्यक्तींची संख्या 21 लाख 80 हजार आहे. पैकी 17 लाख 81 हजार 132 व्यक्तींनी पहिला डोस घेतल्याची नोंदणी तीन-चार दिवसांपूर्वीची आहे. जिल्ह्यातील सुमारे 3 लाखांवरील व्यक्तींनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतलेला नाही. दोन डोस घेतलेल्या व्यक्ती कोरोनापासून पुरेशा संरक्षित झाल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झाला तरी रोगाची तीव्रता कमी असते.

लसीकरणाचा हा फायदा आहे. मात्र, दोन्ही डोस घेऊन पुरेसे संरक्षित झालेल्या व्यक्तींचे प्रमाण जिल्ह्यात केवळ 44.96 टक्के इतकेच आहे.महापालिका क्षेत्र, जत पिछाडीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरणात महापालिका क्षेत्र व जत तालुका पिछाडीवर आहे. जत तालुक्यात पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींचे प्रमाण 65.40 टक्के आहे,

तर महापालिका क्षेत्रात हे प्रमाण 77.73 टक्के आहे. जिल्ह्यात लसीकरणात जत तालुका आणि महापालिका क्षेत्र पिछाडीवर आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 92.75 टक्के व्यक्तींनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तींच्या प्रमाणातही जत तालुका आणि महापालिका क्षेत्रच पाठीमागे आहे.

सांगलीत जिल्हास्तरीय स्टोअरमध्ये 1 लाख लसी उपलब्ध आहेत. शासनाकडूनही लसींचा नियमित पुरवठा होत आहे. लसीकरणाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद देणे आवश्यक आहे. ‘मास्क’चा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालनही महत्त्वाचे आहे. नागरिकांनी पुरेशा दक्षता न घेतल्यास कोरोना पुन्हा उसळी मारू शकतो.

तालुका 18 वर्षांवरील
लोकसंख्या कोरोना प्रतिबंधक
पहिला डोस व टक्के कोरोना प्रतिबंधक
दुसरा डोस व टक्के
आटपाडी 105924 94714 (89.42) 46393 (43.80)
जत 251182 164275 (65.40) 61403 (24.45)
कडेगाव 109416 96715 (88.39) 52077 (47.60)
क.महांकाळ 116537 102918 (88.31) 58879 (50.52)
खानापूर 130221 101673 (78.08) 48955 (37.59)
मिरज 269133 219656 (81.62) 110359 (41.01)
पलूस 126162 106059 (84.07) 60443 (47.91)
शिराळा 124634 115600 (92.75) 74623 (59.87)
तासगाव 192332 162968 (84.73) 90360 (46.98)
वाळवा 348861 300662 (86.18) 192053 (55.05)
महापालिका 406400 315892 (77.73) 185026 (45.53)
जिल्हा एकूण 2180802 1781132 (81.67) 980571 (44.96)

 

Back to top button