कारवाईच्या बडग्याने बेदाणा व्यापारी नरमल | पुढारी

कारवाईच्या बडग्याने बेदाणा व्यापारी नरमल

सांगली ; पुढारी वृत्तसेवा

दिवाळीपूर्वीच्या सौद्यात विक्री झालेल्या बेदाण्याची येणेबाकी सर्व व्यापार्‍यांनी दिली नसल्याने बाजार समितीकडून त्यांना बंदी घालण्याची नोटीस बजावण्यात आली होती. कारवाईचा बडगा उगारल्यानंतर व्यापारी नरमले. अनेक शेतकर्‍यांचे थकीत देणे झीरो केले. त्यामुळे शुक्रवारपासून मार्केट यार्डात बेदाणा सौदे निघणार आहेत, अशी माहिती बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी
दिली.

सांगली – तासगाव बेदाणा व्यापारी संघटनेतर्फे बेदाणा व्यवहारात पारदर्शकता यावी. पेमेंटची देवाण-घेवाण योग्य वेळेत व्हावी, यासाठी संघटनेतर्फे पंधरा वर्षांपासून शून्य पेमेंट संकल्पना दिवाळीमध्ये राबवली जाते. फसव्या खरेदीदारांना अटकाव करण्यासाठी दिवाळीला येणी-देणी पूर्ण करण्याचा नियम संघटनेने अंमलात आणला
आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने परिपत्रक काढून बेदाणा खरेदीदार, व्यापारी यांनी अडत दुकानांचे शून्य पेमेंट करण्यास सांगितले आहे. त्यासाठी दि. 16 नोव्हेंबरची मुदत दिली होती. तसेच सर्व अडत्यांनी देखील खरेदीदार, व्यापार्‍यांकडून शून्य पेमेंटची पूर्तता झाल्याची माहिती लेखी देण्यास सांगितले होते. बेदाणा व्यापारी संघटनेने शून्य पेमेंटसाठी अडत्या व व्यापार्‍यांना मुदत दिली
होती.

काही बड्या व्यापार्‍यांमुळे यंदाच्या हंगामात शून्य पेमेंटची पूर्तता होऊ शकली नाही. त्यामुळे बेदाणा व्यापारी संघटनेने दिवाळी सुट्टी संपून पंधरा दिवस झाले तरी सौदे सुरू केले नव्हते. मात्र, एक व्यापारी वगळता सर्व व्यापार्‍यांनी शून्य पेमेंट केल्याने सौदे काढण्यात येणार असल्याचे कुंभार यांनी सांगितले.

यावेळी प्रथमच सर्व व्यापार्‍यांनी शून्य पेमेंट केले आहे. परिणामी शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. बहुसंख्य व्यापार्‍यांनी शून्य पेमेंट झाल्याची पत्रे रात्री उशिरा बाजार समितीकडे दिली.
उर्वरित व्यापारी आज सौदे सुरू पत्रे देणार आहेत, जे देेणार नाहीत, त्यांच्यावर बाजार समिती कारवाई करणार
आहे.

Back to top button