एस.टी. कामगारांच्या नेतृत्वात उभी फूट | पुढारी

एस.टी. कामगारांच्या नेतृत्वात उभी फूट

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

एस.टी. कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या नेतृत्वात आता उभी फूट पडली आहे. आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी परिवहनमंत्र्यांनी केलेल्या पगारवाढीनंतर आझाद मैदानातील आंदोलन स्थगित करण्याची घोषणा गुरुवारी केली.

मात्र, आंदोलन स्थगित करण्याऐवजी या दोन्ही नेत्यांनाच आम्ही आझाद मैदानातून ‘आझाद’ करत असल्याची प्रतिक्रिया अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच एस.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण होईपर्यंत आंदोलनासह संप सुरूच ठेवण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली

परिवहनमंत्र्यांनी दिलेल्या पगारवाढीच्या ऑफरवर कामगारांशी बोलून पुढील भूमिका जाहीर करू, असे आमदार पडळकर आणि खोत यांनी बुधवारी रात्री माध्यमांना सांगितले होते. मात्र, विलीनीकरणावर ठाम असलेल्या कामगारांनी वेतनवाढीस विरोध केल्यानंतरही पडळकर आणि खोत यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आश्चर्य व्यक्त होत आहे.

तसेच आझाद मैदानात आंदोलन करणार्‍या पडळकर आणि खोत यांना कामगारांच्या रोषाबाबत कल्पना मिळाल्यामुळेच त्यांनी विधानभवन येथे जात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केल्याचा आरोप संतप्त कामगारांनी केला.

परिवहनमंत्र्यांनी केलेली पगारवाढ ही ऐतिहासिक असून, एस.टी. कामगारांच्या आंदोलनाचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली. सदाभाऊ खोत पाया पडल्याची क्लिप माझ्याकडे!आमदार सदाभाऊ खोत यांनी पराभवाच्या मानसिकतेमधून काही वक्तव्ये केली आहेत.

मात्र, विश्वास नांगरे-पाटील त्यांच्या मागे लागले होते, त्यावेळी भीतीपोटी खोत पाया पडल्याची क्लिप माझ्याकडे असल्याचा दावा अ‍ॅड. सदावर्ते यांनी केला. तसेच खोतांप्रमाणे मी कुठलीही ओबीसी शाळा बळकावलेली नाही, त्यामुळे मला कुणालाही घाबरण्याचे कारण नसल्याचे म्हणत अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकरांची आंदोलनातून एक्झिट
विलीनीकरणापर्यंत अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते कामगारांसह संपावर ठाम

Back to top button