प्रभाग ‘16 अ’ची पोटनिवडणूक 21 डिसेंबरला | पुढारी

प्रभाग ‘16 अ’ची पोटनिवडणूक 21 डिसेंबरला

सांगली : पुढारी वृत्तसेवा

महानगरपालिकेच्या प्रभाग ‘16-अ’च्या पोटनिवडणुकीसाठी दि. 21 डिसेंबररोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आचारसंहिता या प्रभागापुरतीच लागू झाली आहे.

माजी महापौर व काँग्रेसचे नगरसेवक हारूण शिकलगार यांच्या निधनामुळे महापालिकेच्या प्रभाग ‘16-अ’ची जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेवर पोटनिवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम नुकताच झाला आहे. अंतिम मतदार यादी मतदान केंद्रनिहाय अंतिम झालेली आहे. 24 हजार 390 मतदार आहेत.

राज्या निवडणूक आयोगाने बुधवारी सांगलीसह राज्यातील चार महानगरपालिकांमधील चार जागांवरील पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता अंमलात राहील.

निवडणूक आचारसंहिता निवडणूक होणार्‍या प्रभागात लागू राहील. मात्र या प्रभागातील मतदारांवर विपरित प्रभाव टाकणारी कोणतीही कृती/घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकार्‍यांना इतरत्र सुध्दा करता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

काँग्रेसकडून तौफिक शिकलगार

महापालिकेच्या सन 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग 16 मधून काँग्रेसचे 2 व भाजपचे 2 उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग ‘16 अ’ मधून काँग्रेसचे हारूण शिकलगार निवडून आले होते. त्यांचे निधन झाल्याने प्रभाग 16-अ ची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून शिकलगार यांचे पुत्र तौफिक यांना उमेदवारी मिळणार आहे. भाजपनेही लढतीचे संकेत दिले आहेत.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे म्हणाले, हारूण शिकलगार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपला विनंती केली जाणार आहे.

मतदार

पुरूष मतदार : 12 हजार 128
स्त्री मतदार : 12 हजार 262
एकूण मतदार : 24 हजार 390

निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज स्वीकारणे : 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर
उमेदवारी अर्जांची छाननी : 7 डिसेंबर
उमेदवारी अर्ज मागे : 9 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत
मतदान : 21 डिसेंबर
मतमोजणी : 22 डिसेंबर

 

 

 

Back to top button