Kharsundi Yatra : आलिशान कारपेक्षा बैलांचे मोल अधिक: खरसुंडी यात्रेत खिलार बैलांना लाखोंची बोली

Kharsundi Yatra : आलिशान कारपेक्षा बैलांचे मोल अधिक: खरसुंडी यात्रेत खिलार बैलांना लाखोंची बोली
Published on
Updated on

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : खरसुंडी येथील पौषी यात्रेत खिलार जनावरांच्या बाजारात पैदाशीसाठी लागणाऱ्या खिलार कपिला जातीच्या बैलांना लाखोंची बोली लागली. कोंबडवाडी – कोळा (ता. सांगोला जि. सोलापूर) येथील सोन्या आणि गज्या हे दोन धिप्पाड बैल यात्रेचे आकर्षण ठरले. कृषी उत्पन्न बाजार समितीकडे साधारणपणे सात कोटींची खरेदी विक्री नोंद झाली.  Kharsundi Yatra

सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथील जनावरांची यात्रा जातिवंत खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध आहे. यंदा बाजार समिती आणि ग्रामपंचायतीने खरसुंडी- नेलकरंजी रस्त्यावर घोडे खुर येथे ही यात्रा भरवली होती. खुल्या माळावर ५० एकरात ही यात्रा पसरली होती. या  यात्रेत खरेदी-विक्रीची १२ कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. या यात्रेत खोंडांना चांगली मागणी होती. शर्यती पुन्हा सुरू झाल्याने खोंडांना चांगला भाव मिळाला. शेतीसाठी लागणाऱ्या बैलांना ५० हजार ते २ लाखांचा दर मिळाला. तर शेळ्या-मेंढ्याच्या बाजारात देखील चांगली आवक झाली. या बाजारात पाच लाखांची उलाढाल झाली. Kharsundi Yatra

कोंबडवाडी कोळे येथील बिरा पांडुरंग सरगर यांचे दोन खिलार कपिला जातीचे बैल यात्रेचे आकर्षण ठरले. काळा रंग, चकाकती कांती, डौलदार शिंगे, आकर्षक बांधा असलेल्या या देखण्या बैलांची जोडी लक्ष वेधून घेत होती. ४ वर्षांच्या सोन्याला ५० लाखांची तर साडेचार वर्षांच्या गज्याला ३० लाखांची बोली लागली. परंतु या उमद्या जनावरांची खरेदी विक्री झाली नाही.

काळ्या रंगाच्या खिलार कपिला बैलांचा उपयोग पैदाशीसाठी केला जातो. संख्या कमी असल्याने हे बैल दुर्मिळ आहेत. त्यामुळे या बैलांना लाखोंचे मोल मोजावे लागते. चार वर्षांपूर्वी पुण्यातून खरेदी केलेल्या सोन्याला आम्ही पोटच्या पोराप्रमाणे सांभाळले आहे. त्यांना रोज २ हजार रुपयांचे खाद्य लागते. राज्यातील अनेक पशु प्रदर्शनात या जोडीला पुरस्कार प्राप्त झाले आहेत, असे बिरा पांडुरंग सरगर यांनी सांगितले.

बाजार तळावर २० हजारहून अधिक जनावरांची आवक झाली. पहिल्या टप्प्यात कमी वयाच्या खिलार खोंडाची विक्री मोठ्या प्रमाणावर होऊन चांगला दर मिळाला. कर्नाटकमधून येणारे शेतकरी, व्यापारी ज्यांना 'हेडी 'म्हणून ओळखले जाते. त्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री केली. यावर्षी २० हजारांपासून ते ७० हजारपर्यंत खरेदी झाली. शर्यतीसाठी मोठ्या खोंडांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री झाली. तर, शेती कामाच्या बैलाला मागणी कमी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विशेषतः पुणे, सातारा, बारामती येथील शेतकऱ्यांनी खोंडांची खरेदी केली.

बाजार तळावर जनावरांना पाण्याची सोय आणि विद्युत पुरवठाही करण्यात आला आहे. जनावरांना पाणी कमी पडू नये, म्हणून विशेष काळजी घेण्यात आली. सोमवारी (दि.२९) जनावरांचे प्रदर्शन असून त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

संतोष पुजारी,  सभापती, बाजार समिती

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news