Prakash Jamdade Journy : रोजगार हमी मजूर ते जिल्हा बँक संचालक | पुढारी

Prakash Jamdade Journy : रोजगार हमी मजूर ते जिल्हा बँक संचालक

जत; विजय रूपनूर

सर्व सामान्यांच्या प्रश्‍नांना न्याय देण्यासाठी जीवन प्राधिकरण मधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावरील नोकरीचा राजीनामा देत  सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रकाश जमदाडे यांनी उडी घेतली. दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असताना रोजगार हमी मजूर ते नोकरी, नोकरीचा राजीनामा देऊन दुय्यम बाजार आवार सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे सभापती, त्यानंतर आता जिल्हा बँकेचे संचालक असा  राजकीय प्रवास प्रकाश जमदाडे यांनी केला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार सावंत यांचा पराभव केल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. (Prakash Jamdade Journy)

जमदाडे यांनी नुकताच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांचा पराभव केल्याने चर्चेत आले आहेत. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सावंत अतिशय निकटवर्ती व नातेवाईक असल्याने त्याच्यासाठी ही निवडणूक जिल्ह्यात प्रतिष्ठेची बनली होती.

सुनील चव्हाण, अशोक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमदाडे राजकारणात आले. माजी आमदार विलासराव जगताप यांनी त्यांना वेळोवेळी विविध क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. या संधीचे सोने करीत त्यांनी मिळालेल्या पदाची शान वाढविली. यामुळे त्यांची व जनसामन्याची कायम नाळ बनली आहे. त्यांचा फायदा या निवडणुकीत त्यांना झाला आहे.

काही महिन्यांपूर्वी त्यांनी शेतकरी मेळावा घेत काही सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. दरम्यान च्या काळात जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाली. यावेळी त्यांनी आपला अर्ज दाखल केला होता. जतची संस्था गटातील जागेची उमेदवारी महाविकास आघाडीने विद्यमान आमदार सावंत यांना दिल्याने महाविकास आघाडीत सावंत यांच्याविषयी असलेली नाराजी, मतदारांच्यात असलेली नकार घंटा हीच मेख लक्षात घेवून, जमदाडे यांनी उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणापर्यंत माघारी घेतला नाही. (Prakash Jamdade Journy)

माजी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित शेतकरी पॅनल मधून उमेदवारी ठेवली. विद्यमान आमदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचे आव्हान स्विकारले आणि ते यशस्वीही झाले. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील जमदाडे या सर्वसामान्य नेतृत्वाने आमदार सावंतर यांचा केलेला पराभव नजरेआड करून चालणार नाही.

हे ही वाचा :

Back to top button