जत; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यातील वंचित गावांना वरदायी ठरणाऱ्या म्हैसाळ विस्तारित योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. जतचे माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, कार्यकारी अभियंता रोहीत कोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनी या योजनेची पाहणी आज (दि. ४) केली. मिरज तालुक्यातील आरग पासून ते जतच्या येळदरी पर्यंत योजनेची पाहणी केली. जलसंपदा विभागाचे अधिकारी, पत्रकारांचे शिष्टमंडळही या दौऱ्यात सहभागी झाले होते.
यावेली पार्श्वभूमीवर माजी आमदार विलासराव जगताप, प्रकाश जमदाडे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकांऱ्यासह मिरजेपासून ते जतच्या येळदरी पर्यंत कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून माहीती घेतली. शिवाय कामाची गती आणि बंदीस्त पाईप लाईनची गुणवत्ता पाहून जगताप व जमदाडे यांनी समाधान व्यक्त करत अधिकारी घेत असलेल्या कष्टाचेही विशेष कौतुक केले.
माजी आमदार जगताप यावेळी बोलताना म्हणाले की, तालुक्याला हक्काचे पाणी विस्तारीत योजनेतूनच मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी या योजनेसाठी सतत पाठपुरावा करून शक्य तितक्या लवकर पाणी आणण्यासाठी काम केले पाहीजे. आज अधिकारी चांगले काम करत आहेत. कामाचा दर्जाही चांगला आहे. आता सरकारने पुढच्या टप्याची ही टेंडर प्रक्रीया तातडीने राबवावी. या योजनेचे काम थांबणार नाही, याची दक्षता आम्ही घेवू, अधिकाऱ्यांनी शेतकरी, प्रशासन यांच्याशी समन्वय साधत योजनेला गती दयावी, असे मत विलासराव जगताप यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना प्रकाश जमदाडे म्हणाले की, जत तालुक्यातील वंचित ६५ गावांसाठी दुसरी लाईफ लाईन ठरलेल्या दोन हजार कोटींच्या विस्तारीत म्हैसाळ योजनेचे काम गतीने सुरू असून, पहिल्या टप्यात ५७ किलोमीटरची सहा फुटी दुहेरी बंदीस्त पाईप लाईन टाकण्यात येत आहे. यापैकी सात किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरची योजना सुरू व्हावी म्हणून माजी आमदार विलासराव जगताप यांच्यामुळे मार्गी लागत आहे असेही जमदाडे म्हणाले.
या संपूर्ण विस्तारीत योजना देत असताना प्रशासकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हैसाळ विस्तारीत योजना आरग बेडगपासून सुरू आहे. पहिल्या टप्यात जतच्या येळदरी मल्लाळ पर्यंतचा ५७ किलोमीटरचा हा टप्पा आहे. यातील सात किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. एकाचवेळी आरग, बेडग, लोणारवाडी आणि येळदरी अशा तीन ठिकाणी कामाला सुरूवात झाली आहे. बेडगपासून कुडणूर पर्यंत १७०० व्यासाची दुहेरी पाईप लाईन असणार आहे. तिथून पुढेही साडे पाच फुटाच्या लोखंडी दुहेरी पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. यासाठी भारतातील नामांकीत सिमेंट कंपनीकडून या पाईप लाईन तयार करण्यात आल्या आहेत. तर लोखंड पाईप जिंदाल कंपनीच्या असणार आहेत. तसेच तीन ठिकाणी पाण्याचे लिष्ट असणार आहे. यासाठी बेडग येथे ११०० एच.पी.च्या चार मोटरी, मिरवाड येथे १५०० एच.पी.च्या चार मोटरी, मिरवाड येथे ३००० एच.पी.च्या चार मोटरी असतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.