मिरज; पुढारी वृत्तसेवा : बेवारस मृतदेहावर दावा करून विम्याची 25 लाखांची रक्कम हडपण्याच्या प्रयत्नातील दोघांना मिरज रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मारुती बेलदार आणि प्रीतम कांतिलाल मछले (रा. जयसिंगपूर) अशी त्यांची नावे आहेत. (त्यांचे वय आणि सविस्तर पत्ता पोलिसांनी सांगितला नाही) बोगस नावाने विमा पॉलिसी उतरवून बेवारस मृतदेह विमाधारकाचाच असल्याचे भासविण्याचा धक्कादायक प्रकार रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघड झाला. अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडी ठोठावली.
याबाबत माहिती अशी की, मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गावर रूकडी येथे 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्र एक्स्प्रेसखाली सापडून एकाचा मृत्यू झाला होता. त्याच्या खिशात बजरंग बेलदार (रा. जयसिंगपूर) या नावाचे आधार कार्ड, पॅन कार्ड व एक मोबाईल क्रमांक सापडला होता.
त्यावर रेल्वे पोलिसांनी संपर्क साधला. यावेळी मारुती श्रीमंत बेलदार बोलला. तो रेल्वे कर्मचारी आहे. त्याने मृत व्यक्ती आपला भाऊ बजरंग असल्याचे सांगितले.
मारुती व प्रीतम यांनी येऊन मृत हा बजरंग बेलदारच असल्याचे सांगून मृतदेह ताब्यात घेतला. तसेच त्यावर रातोरात अंत्यसंस्कारही केले. दुसर्या दिवशी रवींद्र शिंगाडे (रा. इचलकरंजी) या व्यक्तीने रेल्वे पोलिस ठाण्यात येऊन बेवारस मृतदेहाची छायाचित्रे पाहिली. त्याने हा माझा भाऊ सचिन शिंगाडे (वय 46, रा. इचलकरंजी) असल्याचा दावा केला.
या प्रकारामुळे पोलिसही चक्रावून गेले. मारुती यास भाऊच नसल्याची पोलिसांना माहिती मिळाली. सुरुवातीला मृतदेह चुकून नेल्याचे सांगणार्या मारुतीने पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, एक लाखाच्या बदल्यात बेवारस मृतदेह माझ्या भावाचा असल्याचा बनाव केल्याची कबुली दिली. मारुतीचा साथीदार प्रीतम याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर हे बोगस विमा प्रकरण उजेडात आले.
प्रीतम व त्याच्या साथीदारांनी रेल्वे कर्मचारी मारुती यांच्या बजरंग बेलदार या अस्तित्वात नसलेल्या भावाच्या नावाने काही महिन्यांपूर्वी 25 लाखांची विमा पॉलिसी केली होती. या विमा पॉलिसीची रक्कम मिळविण्यासाठी ते बेवारस मृतदेहाच्या शोधात होते. याचवेळी सचिनचा मृतदेह मारुती आणि प्रीतम यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून विमा पॉलिसीची रक्कम हडपण्याचा डाव आखला होता, तो पोलिसांनी हाणून पाडला.
महाराष्ट्र एक्स्प्रेसखाली सचिन शिंगाडेचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर रेल्वेत खलाशी असलेल्या मारुती बेलदारने प्रीतमला याबाबत माहिती दिली होती. प्रीतमने सचिन यांच्या मृतदेहाजवळ बोगस ओळखपत्र व मोबाईल क्रमांक ठेवल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्याद़ृष्टीने तपास सुरू आहे.
प्रीतमने त्याच्या साथीदारांच्या मदतीने यापूर्वीही बेवारस मृतदेहाच्या टाळूवरील लोणी खाल्ल्याचा पोलिसांना संशय आहे. यामध्ये संबंधित विमा कंपनीमध्ये काम करणार्या काहीजणांचा समावेश असावा, असा देखील संशय पोलिसांना असून त्यादृष्टीने देखील तपास करण्यात येत आहे.