सांगली : जिल्हयात एस.टी. कोमात; खासगी वाहतूक जोमात | पुढारी

सांगली : जिल्हयात एस.टी. कोमात; खासगी वाहतूक जोमात

सांगली, पुढारी वृत्तसेवा

सांगली, मिरजेसह जिल्ह्यात गेल्या बारा दिवसांपासून विविध मागण्यांसाठी एस. टी. कर्मचारी कृती समितीच्यावतीने संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे एस.टी. वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. या संपाचा गैरफायदा घेऊन खासगी वाहतूक अवैधपणे जोमात सुरू आहे. नियम धाब्यावर बसवून मनात येईल त्या दराने प्रवाशांकडून पैसे घेतले जात आहेत. या गंभीर प्रकरणाकडे वाहतूक पोलिसांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने सर्वच स्तरातून संतापाची लाट उसळली आहे.

एस.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे जिल्ह्यातील वाहतूक यंत्रणा कोलमडून पडली आहे. अनेक कर्मचार्‍यांचे निलंबन करूनही अद्यापही संप मागे घेण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाकडून एस. टी. आगारात खासगी वाहने उभी करून वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांची सोय करण्यापेक्षा मनमानी भाडे वसुली खासगी वाहतूक करणार्‍यांकडून सुरू असल्याची तक्रार आहे.

जिल्हयात एस.टी. कोमात; खासगी वाहतूक जोमात

मनमानी दराने तसेच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून प्रवाशांच्या जीवाशी खेळ अनेकांनी सुरू केला आहे.
सांगलीतून कोल्हापूरसाठी 200 आणि इस्लामपूर, इचलकरंजी व हातकणंगलेसाठी प्रत्येकी 100 रुपये घेतले जात आहे. पलूस 55 , आष्टा 50 रुपये, जयसिंगपूर 50 रुपये, जत 130 , कवठेमहांकाळ 70 रुपये भाडे आकारले जाते.

पुणे प्रति व्यक्ती 700 ते 1000 तर मुंबईसाठी 1800 ते 2000 रुपये असे दर आकारले जात आहेत. त्यामुळे प्रवाशांतून संतापाची लाट उसळली आहे. एस. टी. वाहतूक बंद असल्याने याचा गैरफायदा खासगी वाहतूक करणार्‍यांनी घेतला आहे.

एस. टी. वाहतूक बंद असल्याने प्रवासी वडाप, रिक्षा, टॅक्सी अशा मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत आहेत; परंतु क्षमतेपेक्षा जादा प्रवासी बसवून अवैध वाहतूक जोमात सुरू आहे. वाहतूक पोलिस, आरटीओ आणि लोकप्रतिनिधी गप्प आहेत.

विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय
जिल्ह्यात शाळा, कॉलेज सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. वडाप, रिक्षामध्ये दाटीवाटीने बसावे लागत असल्याने मुलांचे हाल होत आहेत.

Back to top button