मिरज : ओढ्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू - पुढारी

मिरज : ओढ्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू

मिरज ; पुढारी वृत्तसेवा : टाकळी (ता. मिरज) येथील ओढापात्रात अंघोळीसाठी गेलेल्या तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. 5) दुपारी ही घटना घडली. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने कुटुंबावर शोककळा पसरली होती.

ओढ्यात बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये नंदिनी देवा काळे (वय 16), मेघा काळे (18) आणि स्वप्नाली पवार (6, रा. आंबेडकरनगर, टाकळी) यांचा समावेश आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वरील तिन्ही मुली कुटुंबासमवेत टाकळी येथील आंबेडकरनगर येथे राहण्यास आहेत. टाकळी येथील मालगाव रस्त्यावरील ओढ्यामध्ये शुक्रवारी दुपारी त्या अंघोळीसाठी गेल्या होत्या.

नंदिनी, मेघा अणि स्वप्नाली या तिन्ही मुली ओढा पात्रात उतरल्या; परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने वाळू उपसा केलेल्या खोल खड्ड्यात त्या बुडाल्या. तिघींनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

बराच वेळ झाला तरी मुली घरी परत न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी ओढ्याकडे धाव घेतली. ओढापात्रात सर्वत्र शोधाशोध करून देखील त्या मिळून आल्या नाहीत. त्यानंतर एका ठिकाणी तिन्ही मुलींचे चप्पल आढळून आले. तीन मुली बुडून मृत झाल्याची माहिती गावात वार्‍यासारखी पसरली. टाकळी आणि मल्लेवाडी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बुडालेल्या मुलींची शोध मोहीम राबविण्यात आली. ओढ्यातील पाण्यात शोध घेत असताना एका खड्ड्यात तिघींचे मृतदेह मिळून आले. मुलींचे मृतदेह पाहताच कुटुंबाने हंबरडा फोडला होता. ऐन दिवाळीत तीन मुलींचा मृत्यू झाल्याने कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. तिन्ही मुलींवर मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मुलींचा मृत्यू झाल्याने दोघांना बेदम मारहाण

टाकळी (ता. मिरज) येथे अंघोळीसाठी गेलेल्या मुलींचा बुडून मृत्यू झाल्याच्या रागातून विज्युत शिसफुल (वय 32) आणि जिगल्या आप्पा काळे (दोघे रा. आंबेडकरनगर, टाकळी) या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी गवड्या शंकर काळे (रा. टाकळी) याच्या विरोधात विज्युत शिसफुल याने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गवड्या काळे याच्या कुटुंबातील तीन मुली टाकळी येथील ओढा पात्रात अंघोळीसाठी गेल्या होत्या.

त्यावेळी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या कारणातून गवड्या काळे याने विज्युत शिसफुल याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर जिगल्या काळे याला डोक्यात दगडाने मारुन गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे विज्युत शिसफुल याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Back to top button