विटा; पुढारी वृत्तसेवा : कोणी कुठेही जाऊदे २०२४ ची खानापूर विधानसभेची निवडणूक एक लाख टक्के आपण लढविणार आहोत आणि जिंकणार आहोत असा निर्धार भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोलून दाखवला.
खानापूर तालुक्यातील तामखडी येथील विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते. यावेळी त्यांनी आज (दि. ३०) माजी आमदारांवर खरपूस शब्दांत टीका केली. आमदार पडळकर म्हणाले,आताच गावा गावातली राजकीय परिस्थिती बदललेली आहे २०२४ ला ती आणखी बदलणार आहे. त्यामुळे तुम्ही काय होणार कसे होणार हे डोक्यातून काढून टाका. गेले तीन वर्षापासून मी जे काम केले आहे ते माझे इथल्या आजी माजी आमदारांना आव्हान आहे. तुम्ही चार वेळा आमदारकी केली, पण लोकांचे प्रश्न तसेच आहेत. विद्यमान आमदारांनी १९९० पासून या मतदार संघाचे नेतृत्व केले आहे पण आजही गावागावात काय परिस्थिती आहे ? त्यामुळे कोणीही कुठेही जाऊ दे, २०२४ ची खानापूर विधानसभेची निवडणूक एक लाख टक्के आपण लढविणार आहोत आणि जिंकणार आहोत. त्याच्यासाठी काहीही करायला लागले तरी आपली तयारी आहे हा संदेश तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. त्या दृष्टीने तुम्ही सगळ्यांनी कामाला लागा असे आवाहनही आमदार पडळकर यांनी कार्यकर्त्यांना केले.