आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : आटपाडी शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी १५ ऑगस्ट रोजी मानवी साखळी आंदोलन केले जाणार आहे. शहरातील नागरिकांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून या अनोख्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आटपाडी तालुक्याचे ठिकाण आहे.आता नगरपंचायत स्थापन झाली आहे. परंतु, ३५ हजार लोकसंख्येच्या या शहरातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे.
आटपाडी शहरातील एस.टी.स्टँड ते बाजार पटांगण दरम्यानची मुख्य बाजारपेठ,बाजारपटांगण ते पोलीस स्टेशन हा रस्ता,एस.टी.स्टँड ते साई मंदिर कडे जाणारा रस्ता खराब झाला आहे. शहरातील नागरिकांना या तीन पैकी किमान एक रस्ता दररोज पार करावा लागतो. नियमितपणे या रस्त्यावरून ये जा करावी लागते. मात्र, हे रस्ते विविध कारणांमुळे खड्डेमय झाले आहेत. नवीन बांधकामे,गटारांची दुरुस्ती,नवीन गटार काम, पाइपलाईनसाठी खुदाई,पिण्याचे पाणी पुरवठा करणारी पाइपलाईन फुटल्याने आणि नागरिकांनी पाणी भरून रिकामे सोडलेल्या नळातून वाहणारे पाणी आदी कारणांमुळे या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. चारचाकी वाहन मुख्य आणि अरुंद पेठेतून जात नाही.मोटारसायकल कुठे घसरेल ते सांगता येत नाही.चालत जाणे देखील मुश्किल झाले आहे.