सांगली; पुढारी वृत्तसेवा : अॅपेक्स कोरोना हॉस्पिटलचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास हे प्रकरण 'सीबीआय'कडे नेऊ, असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिला. 'अॅपेक्स' हॉस्पिटलसाठी दिलेला परवाना योग्य पद्धतीने नसेल तर तो महापालिकेच्या आयुक्तांचा दोष आहे, असेही शेलार यांनी म्हटले आहे.
अॅपेक्स कोरोना हॉस्पिटलच्या कारभारावर भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकार्यांनी आवाज उठवला. त्यामुळे पोलिसात गुन्हा नोंद झाला. अटकेची कारवाई झाली. एका हॉस्पिटलमध्ये 80 हून अधिकरुग्णांचा मृत्यू होणे हे प्रकरण गंभीर आहे. या हॉस्पिटलला परवाना देताना योग्य पद्धत अवलंबली गेली नसेल तर तो आयुक्तांचा दोष आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा हे प्रकरण 'सीबीआय'कडे नेऊ, असा इशाराही शेलार यांनी दिला आहे.
'अॅपेक्स'वरून माध्यमांना बजावलेल्या नोटिसांचा निषेध आहे. माध्यमांच्या मुस्कटदाबीचा निषेध आहे, असेही शेलार यांनी म्हटले.
'अॅपेक्स'प्रकरणी विधीमंडळात भाजपतर्फे आवाज उठविला जाणार होता, मात्र विधानसभेचे कामकाज किती दिवस चालले हे सर्वांना माहिती आहे, असेही शेलार यांनी सांगितले.