इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : नोकरीच्या आमिषाने गंडा घालणार्या शिरवळ येथील संशयिताचे आठजणांनी अपहरण केले. गुरुवारी रात्री पेठनाका येथे इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून त्या टोळीला जेरबंद केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या तीन कार (किंमत 23 लाख रुपये) ताब्यात घेतल्या आहेत.
रोहित प्रतापराव नलवडे (36, रा. शिराळा), प्रताप संपत सावंत (42), उमेश वसंत सावंत (34), राकेश सुधाकर गंवडी (28, तिघे रा. काळमवाडी, ता. वाळवा), रोहित सर्जेराव पाटील 29), अक्षय मोहन गायकवाड (28, दोघे रा. येलूर, ता. वाळवा), पोपट महादेव शिंदे (वय 33, रा. पाडळी, ता. शिराळा), मनोज महादेव पाटील (28, रा. मांगले, ता. शिराळा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान, अपहृत बाबासो आनंदा कुंभार (38, रा. शिरवळ) याने नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात मिरज ग्रामीण, शिराळा पोलिस ठाण्यासह इतर जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत.
संशयित राकेश, रोहित, अक्षय, पोपट आदींना संशयित बाबासो कुंभार याने नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातला होता. तो पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. गुरुवारी सायंकाळी शिरवळ येथील भर वस्तीतून बाबासाहेब कुंभार याचे फिल्मी स्टाईलने टोळीने अपहरण केले. कुंभार याच्या घरच्यांनी पोलिसांत धाव घेतली होती.
ज्यांनी अपहरण केले त्यांच्याकडून, त्यांच्या नातेवाईकांच्याकडून कुंभार याने नोकरीच्या आमिषाने लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात कुंभार याच्याविरोधात नोकरीच्या आमिषाने 90 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच शिराळा येथे 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा तक्रारी अर्ज असल्याचे पोलिसांनी सांगितले. बाबासो कुंभार याला मिरज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कुंभार याचे आणखी कारनामे समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कुंभार याचे अपहरण केल्याची क्लीप सर्वत्र फिरू लागल्याने शिरवळ परिसरात खळबळ उडाली. सीसीटीव्ही कॅमेर्यात कारचे फुटेज कैद झाले होते. पुणे पोलिसांनी इस्लामपूर पोलिसांना संबंधितांची माहिती दिली. सहाय्यक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण यांनी पोलिसांना सूचना दिल्या. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल जाधव, पोलिस हवालदार अरुण पाटील, सजन पाटील, गणेश वाघ, दीपक पाटील, प्रशांत देसाई, पोलिस कॉन्स्टेबल आलमगीर लतिफ, सतीश खोत यांनी पेठनाका परिसरात गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सापळा लावला. त्यावेळी तीन कारमधून आलेले संशयित रोहित नलवडे, प्रताप सावंत, उमेश सावंत, राकेश गंवडी, रोहित पाटील, पोपट शिंदे, मनोज पाटील, अक्षय गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.