अलौकिक तीर्थक्षेत्र : श्रीक्षेत्र नरसिंहपूर | पुढारी

अलौकिक तीर्थक्षेत्र : श्रीक्षेत्र नरसिंहपूर

इस्लामपूर; सुनील माने : दक्षिण वाहिनी असलेल्या कृष्णा नदीच्या काठावर वसलेले वाळवा तालुक्यात नरसिंहपूर गाव. येथील नृसिंह मंदिर ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. इंग्रजांनी ज्यांच्याविरोधात शोधमोहीम चालविली होती, असे अनेक क्रांतिकारक भूमिगत होवून येथे येवून राहिले होते.

जमिनीखाली दोन मजले उतरून गेल्यावर लक्ष्मी नृसिंहाची मूर्ती दिसते. तर शेजारीच कृष्णामाई वाहत असल्याने नदीचंही पाणी खालच्या बाजूला येते. या नदीच्या पाण्यातच पाय बुडवून चालत मूर्तीजवळ जाता येते.

भारतातील नृसिंह देवस्थानापैकी नरसिंहपूर हे एक देवस्थान आहे. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असणारे हे मंदिर असून दरवर्षी उत्सवासाठी राज्यातून भाविक येतात. शासनाकडून या तीर्थक्षेत्राला मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे.

प्रतिवर्षी वैशाख शुद्ध सप्तमीपासून 10 दिवस नृसिंह जयंतीचा उत्सव असतो. सिंहासनावर लक्ष्मीसहीत श्रीनृसिंहाची मूर्ती, श्रींच्या चांदीच्या पादुकासह विराजमान होते. हंड्या झुंबरांनी उत्सवमंडप सुशोभित केला जातो. या उत्सव काळात धार्मिक विधी होतात. दरवर्षी या उत्सवासाठी हजारो भाविक येतात.

2 हजार वर्षांची अध्यात्मिक परंपरा…

श्री क्षेत्र कोळे-नरसिंहपूरला 2 हजार वर्षांची अध्यात्मिक परंपरा लाभली आहे. बहे-रामलिंग बेटाबरोबरच या नरसिंह मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. भुयारांतरीची ही शोडशभूज नृसिंह देवता. मंदिर आणि संत-महंत-तपस्वी-विभूतींच्या वास्तव्याने पवित्र परिसर, यामुळे सर्व पारमार्थिक पंथीयांच्या पाऊलखुणा या गावात पहावयास मिळतात. सध्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामही सुरू आहे.

हेमाडपंथी मंदिर…

मंदिराचा पूर्व दरवाजा घडीव आणि दगडी आहे. नृसिंह मंदिराच्या पहिल्या उंबरठ्यावर येताच मंदिराचा दिंडी दरवाजा आहे. दिंडी दरवाजावरील विघ्नहर्ता गणेश नम्रभावनेने मंदिरात चला, असे सुचवतो. कृष्णामाईने वळण घेतलेले 12 कि.मी. लांबीचे पात्र डोळ्यात मावत नाही. पहिल्या तटावर उत्तरभागी असणारे प्राचीन चिंचेच्या वृक्षाच्या छायेखाली पडून गेलेल्या पानदरवाजाचे अवशेष दिसतात.

नयनरम्य प्राकृतिक रचना…

नयनरम्य प्राकृतिक रचना, अध्यात्मिक वारसा, धार्मिक श्रध्दा, अध्यात्मासह सामाजिक परंपरा जपणारे गाव आहे. क्षेत्र कोळे-नरसिंहपूर हे लौकिक अर्थाने चिमुकले खेेडेगाव. गावावर निसर्गदेवतेची कृपा आहे. नाथ सांप्रदायाचे मच्छिंद्रनाथ यांच्या सामर्थ्याची प्रचिती देणारा, मच्छिंद्रगड नरसिंहपूरच्या कुशीत उभा आहे.

Back to top button